नेमकी खेळी कोणाची?
नगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. त्यातील दक्षिणेची जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडे आहे, तर शिर्डीची शिवसेनेकडे. मात्र, काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे) गटाने आढावा घेताना नगर दक्षिणमधूनही माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव पुढे आणले होते. जागा वाटपाआधीच शिवसेनेने हे पाऊल उचलले. त्यामुळे आता शिर्डीत वाद निर्माण झाल्यावर घोलप यांनी शरद पवार आणि आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे नेमके कोण कोणावर राजकीय कुरघोडी करीत आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
घोलपांना विरोध कोणाचा आणि का?
शिवसेना (ठाकरे) गट अडचणीत असताना घोलप स्वत: होऊन पुढे आले. त्यावेळी सुरुवातीला आदित्य ठाकरे आणि नंतर अन्य नेत्यांनी त्यांच्या शिर्डीतून उमेदवारीचे संकेत दिले. मात्र, मधल्या काळात राजकारण बदलत गेले. स्थानिक काही कार्यकर्त्यांकडून घोलप यांना विरोध सुरू झाला. अर्थात, तसाच विरोध नंतर वाकचौरे यांनाही झाला. तरीही पक्षातून घोलप यांना स्पष्टपणे का सांगितले जात नाही? त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेले असताना वाकचौरे यांचा पक्षप्रवेश का व कोणी घडवून आणला? घोलप यांना टाळण्यामागे त्यांच्या अपात्रतेचे तांत्रिक कारण आहे की राजकीय? असे सवाल उपस्थित होत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे घोलप यांचे मंत्रिपद गेले होते, पुढे त्यांना शिक्षाही झाली होती. त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले होते.