राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शहराध्यक्षपदी तुषार कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, देवेंद्र तायडे, काशिनाथ नखाते, माधव पाटील आदी उपस्थित होते. रोहित पवार म्हणाले, ‘शरद पवार केंद्रात मंत्री असताना शहरातील विकासासाठी ‘जेएनएनआरयूएम’ अंतर्गत तीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी दूरदृष्टी ठेवून दिला आहे. त्यामुळेच शहरात प्रशस्त रस्ते, पूल झाले. मात्र, गेल्या पाच वर्षांत भाजपची सत्ता असताना कोणती मोठी विकासकामे झाली आहेत. ७० टक्के कामे गुजरातच्या कंपनीला दिल्याचे दिसते. कोणत्याही कंपनीला काम द्या; पण कामे पूर्ण झाली पाहिजेत. तसे होताना दिसत नाही.’
‘पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्वी एका नेत्याच्या पाठीमागे चार-पाच लोक असायचे, हेच कोणाला नगरसेवक करायचे ते ठरवायचे. त्यांच्यामुळे शहरात पक्ष वाढला नाही. त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेतील सत्ता गेली. त्यामुळे ते तिकडे गेले हे बरे झाले,’ असे आमदार रोहित पवार म्हणाले. शिवसेना फोडणाऱ्यांना सर्वांनी गद्दार म्हणून संबोधले. मग राष्ट्रवादी कॉँग्रेस फोडणाऱ्या अजित पवारांना तुम्ही ‘गद्दार’ का म्हणत नाही, असा प्रश्न विचारला असता, ‘आपण इतरांबद्दल का बोलायचे? विकास, बेरोजगारी, जनतेसमोरील प्रश्न यांवर सध्या काम सुरू आहे. आम्ही हे सर्व सोडून फक्त आपापसांत भांडावे, हे तर भाजपला हवे आहे; म्हणून असे काही न करता वैचारिक पद्धतीने लढा देत आहोत,’ असे रोहित पवारांनी सांगितले.