• Mon. Nov 25th, 2024
    पर्यावरणपूरक उत्सवासाठी पाऊल; अंबरनाथ नगरपालिकेकडून शहरात नऊ कृत्रिम तलाव तयार

    म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : गणेशोत्सवात दीड दिवसांपासून ते सात दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी अंबरनाथ नगरपालिकेकडून शहरात नऊ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तर शहरात नव्याने उभे राहणाऱ्या भव्य गृहसंकुलातील नागरिकांसाठी गृहसंकुलाच्या परिसरात विसर्जनाची व्यवस्था करण्यासाठी १० ठिकाणी लहान आकारांचे कृत्रिम कुंड ठेवण्यात येणार आहेत. तर उल्हासनगर महापालिकेनेही शहरात सात ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

    गणेशोत्सवात गणरायाच्या विसर्जनाची सोय करण्यासाठी प्रशासनाकडूनही जोरदार तयारी करण्यात येत आहे. अंबरनाथ शहरात वाढत्या लोकवस्तीनुसार घरगुती गणेशोत्सव साजरे करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी विसर्जनासाठी गर्दी होत असते. त्यामुळे नागरिकांना घराजवळील परिसरात विसर्जनाची सोय व्हावी तसेच नैसर्गिक जलस्रोतांतील जलप्रदूषण कमी व्हावे, या उद्देशाने पालिकांकडून गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहेत. यासाठी अंबरनाथ पालिकेने पूर्व, पश्चिम भागात नऊ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तसेच कृत्रिम तलाव, कुंड, मंडप तसेच विद्युत व्यवस्थेसाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील चार प्रभागांत एकूण सात ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून नागरिकांना त्या त्या प्रभागात दीड ते सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करता येणार आहे. कृत्रिम तलावांची निर्मिती, विद्युत रोषणाई आणि मंडपासाठी पालिकेकडून ५० लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

    या ठिकाणी व्यवस्था
    अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगर कॉलेज प्लॉट, ग्रीन सीटी, खेर सेक्शन गोडबोले बागेजवळ, कानसई डॉ. वारके रुग्णालयाजवळ, भिम नगर गावदेवी मंदिर, बाल उद्यान गावदेवी मैदान, अंबरनाथ गाव तर अंबरनाथ पश्चिमेत मोरीवली शाळेचे मैदान, चिखलोली एसटीपीच्या मागे या ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय केली आहे. तर नवरेनगर चौक, निसर्ग ग्रीन संकुल, गावदेवी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबरनाथ पालिका कार्यालय वांद्रापाडा चौक, गायत्री मेडिकलच्या मागे, घाडगे नगर, आणि जावसई रिक्षा स्टॅण्ड या ठिकाणी कृत्रिम कुंड ठेवण्यात येणार आहेत.

    चिखलोली धरण, जीआयपी डॅममध्ये विसर्जनबंदी
    अंबरनाथमधील चिखलोली धरण परिसर आणि रेल नीर या बाटलीबंद प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जीआयपी डॅम या दोन्ही नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जनास बंदी करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र जलसंपदा विभाग आणि रेल्वे प्रशासनाकडून स्थानिक पोलिसांना देण्यात आले असून या दोन्ही ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed