छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेला अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आणि अण्णासाहेब माने उपस्थित होते.
बँकेच्या अध्यक्षपदी अर्जुनराव गाढे यांची नुकतीच निवड झाली आहे. सत्तार आणि गाढे यांचे राजकीय लागेबांधे पाहत दानवे यांनी भाषणातून सल्ला दिला. ‘गाढे, कुणाचे शिक्काधारी होऊ नका. सत्तार यांच्या नादी लागू नका. एखाद्या कागदावर सही घेऊन ते तुम्हाला अडचणीत आणतील. ऐन वेळी ते त्याचे काम असल्याचे सांगून मोकळे होतील,’ असा उपरोधिक सल्ला दानवे यांनी दिला. या सल्ल्यामुळे सभागृहात एकच हशा उसळला.
‘आम्हाला अपात्र ठरविण्यासाठी दानवे सारखे मागे लागले आहेत. मात्र, एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला त्याचे भावना मांडण्याची मुभा असते. म्हणूनच हा देश लोकशाही आहे’, असे सत्तार म्हणाले. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे ते कळतच नाही. जे ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आले त्यांच्या मतदारसंघात कामे सुरू आहेत,’ असा दावाही सत्तार यांनी केला.