चाळीसगाव बांधकाम उपविभागाचा अभियंता ज्ञानेश्वर विसपुते याला शनिवारी (दि. १६) मध्यरात्री साडेबारा वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याने तक्रारदाराकडून गडकरी चौक सिग्नल येथे चार लाख रुपयांची लाच स्वीकारली. डॉ. शामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेतून पातोंडा समुहात क्लस्टर विकसित करण्याचे काम तक्रारदाराने हाती घेतले आहे. त्या कामाची चार कोटी ८२ लाख रुपये रक्कम तक्रारदाराला मिळाली. यासह अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्यासाठी संशयिताने पाच लाखांची लाच मागितली. चाळीसगावातील शासकीय कार्यालयात ही चर्चा झाल्यानंतर संशयित शनिवारी नाशिक येथे एका नातलगाकडे खासगी कार्यक्रमासाठी आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्याने तक्रारदाराला गडकरी चौकात भेटण्यासाठी बोलावून लाच स्वीकारली. तत्पूर्वीच तक्रारदाराने एसीबीकडे संपर्क साधल्याने पथकाने त्वरित सापळा रचून संशयित विसपुते याला ताब्यात घेतले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– लाच घेताना संशयिताची पत्नीही सोबत
– संशयिताचे कार्यालय चाळीसगावात, घर धुळ्यात, लाच घेतली नाशिकमध्ये
– काही महिन्यांनी संशयित सेवानिवृत्त होणार होता
– तडजोडीअंती पाचऐवजी चार लाख रुपये घेतले
घरझडतीसह बँक खात्याची तपासणी
संशयित विसपुते हा बांधकाम विभागात कार्यरत आहे. त्याने सर्वाधिक सेवा धुळ्यात बजावली आहे. धुळ्यातील अशोकनगरमध्ये संशयित वास्तव्यास आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने विसपुतेच्या घराची झडती सुरू केली आहे. घरझडतीत फारसे काही समोर आलेले नाही. संशयित तपासकामात अपेक्षित सहकार्य करीत नसल्याचा दावा एसीबीने केला आहे. तर, विसपुतेच्या बँक खात्यांचाही तपास सुरू असल्याने त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.