या वर्षी जव्हार तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्रावर चवळी, कारले, भेंडी, वांगे इत्यादी भाजीपाल्याची लागवड करण्यात आली. मागील वर्षी भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला होता. तेच बघून या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी लागवड वाढवली. परंतु याचा परिणाम विक्रीवर होत आहे. मागणीपेक्षा जास्त उत्पादन झाल्याने भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळत नाही. यात काही शेतकऱ्यांनी प्रथमच भाजीपाला लागवड केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यांचा लागवडखर्चही निघणे कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याचे दर चढे होते. त्यामुळे आपल्यालाही चांगले दर मिळतील, या आशेवर शेतकरी होते. मात्र, उत्पादन सुरू होताच हे दर कोसळले असून आता पीक तोडणीही परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रक्रिया उद्योगाची आवश्यकता
तालुक्यात पिकणारा भाजीपाला हा कमी खतावर फुललेला असल्याने उत्तम दर्जाचा आहे. परंतु, तो मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेणे कमी वेळात शक्य होत नाही व परवडतही नाही. त्यामुळे तालुक्यातच भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची उभारणी झाली, तर शेतकऱ्यांचा भाजीपाला प्रक्रिया करून साठवता येईल, शिवाय योग्य दरात विक्रीही करता येईल.
भाजीपाल्याचे दर (रु. किलोमागे)
भाजी १५ दिवसांपूर्वीचे दर सध्याचे दर
टोमॅटो ६० २०
काकडी ८० ४०
दोडका ८० ४०
कारले १०० ६०
दुधी ८० ४०
मागील वर्षी कमी जागेत भाजीपाला लागवड केली होती. तेव्हा दरही चांगले मिळाले. या वर्षी लागवडक्षेत्र वाढवले. पण आता व्यापारी पडल्या भावात मागणी करत आहेत. आम्हालाही पर्याय नसल्याने मागेल त्या भावात भाजीपाला द्यावा लागत आहे.
– दीपक राऊत, शेतकरी, जव्हार
गृहिणींना दिलासा
श्रावण मास, उपवासांमुळे शाकाहारी भाजीपाला आणावा लागत होता. परंतु दर अधिक असल्याने आर्थिक गणित कोलमडले होते. मात्र आता भाज्यांचे दर निम्मे झाल्याने दिलासा मिळत आहे, असे दीपाली नगरकर या गृहिणीने सांगितले. तर चढ्या भावामुळे टोमॅटो, कोथिंबीर, मेथी आहारातून वर्ज्य केली होती. आता भाज्यांचे दर कमालीचे कमी झाल्याने, तसेच रानभाज्याही उपलब्ध झाल्याने आर्थिक घडी बसवणे सोपे होत आहे, असे स्नेहा पाटील या गृहिणीने सांगितले.