• Mon. Nov 25th, 2024

    हॉटेल चालकाचा कारनामा, मीटरमध्ये छेडछाड, रीडिंग बदललं अन् तब्बल तीन कोटींची वीजचोरी उघड

    हॉटेल चालकाचा कारनामा, मीटरमध्ये छेडछाड, रीडिंग बदललं अन् तब्बल तीन कोटींची वीजचोरी उघड

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: महावितरणच्या भरारी पथकाने पनवेलमधील एका हॉटेलचालकाची तब्बल तीन कोटी रुपयांची वीजचोरी पकडली आहे. दत्ता भोईर असे या हॉटेलचालकाचे नाव असून त्याने मीटरमध्ये छेडछाड करून रीडिंग बदलून ही वीजचोरी केल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या हॉटेलचालकाला वीजचोरीच्या दंडाची रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले असून अन्यथा वीज कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.

    पनवेल शहरातील भरारी पथकाच्या वतीने वीजग्राहकांची तपासणी मोहीम सुरू आहे. या पथकाने पनवेलमधील बीएच रोडवरील दत्ता भोईर यांच्या हॉटेलची तपासणी केली असता, त्यांच्या वीजमीटरच्या रीडिंगमध्ये अनियमितता आढळून आली. त्यामुळे अधिक तपासणी केली असता, हॉटेलचालकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून मीटरची रिडिंग रिव्हर्स करून सुमारे तीन कोटी रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले.

    महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मोठ्या प्रमाणात वीजचोरी शोध मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालिका स्वाती व्यवहारे आणि विभागाचे कोकण परिक्षेत्राचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता बाकू रामदास मानवटकर, साहाय्यक अभियंता कुणाल पिंगळे, साहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी आकाश गौरकर व सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *