रोहित पवारांनी दादा गटातील सुनावलं
‘बडे नेते पक्ष सोडून गेल्याचे जनतेला भावलेले नाही. आगामी काळात अशा स्वार्थी नेत्यांना मतदार आणि पक्षाचे नेते शरद पवार धडा शिकवतील’, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिला. चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ साली आठ-दहा जागा येतील, असे भाष्य करणारे तोंडघशी पडले. छोटे नेते गेल्यानंतर मतदारांना ते आवडले नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल ५४ जागा आणि सत्ताही आली. आता तर बडे नेते पक्ष सोडून गेले. इतकी वर्षे आजोबांसोबत राहिलेलो आहे. हा विचारांचा लढा आहे. त्यांच्याच विचारांचे उमेदवार निवडून आणले जातील. स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना निश्चित धडा शिकवला जाईल, असेही रोहित पवार म्हणाले.
सत्ता आणि पदांसाठी काही नेते गेले
‘राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. शरद पवार यांच्याकडेच पक्ष आहे. सत्ता आणि पदांसाठी काही नेते गेले. पक्ष आणि चिन्ह आमच्याचकडे राहील. मात्र, निवडणूक आयोग केंद्राच्या हातीतील खेळणे झाल्याने काही सांगता येत नाही’, असा आरोपही करून रोहित पवार म्हणाले, सर्वसामान्यांमध्ये
भाजपविरोधी वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीतील जादू लोकांच्या लक्षात आली आहे. प्रचार, प्रसार म्हणजे विकास नाही, प्रश्न सुटलेले नाहीत, ही बाब जनतेला लक्षात आली आहे.’
महाविकास आघाडीत संपूर्ण राज्याचा अभ्यास करून जागांचा योग्य तोडगा काढला जाईल. तीन-चार निवडणुकांमध्ये सातत्याने पराभूत झालेल्या जागा मित्रपक्षाचा विचार करावा. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्यघटनेच्या बाजूने व भाजपच्या विरोधात उभे झालेल्या अन्य उमेदवारांमुळे किती व कसा फटका बसला याचाही विचार करावा लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.
घटनादुरुस्ती गरजेची!
मराठा समाजाला १३ ते १६ टक्के आरक्षण ओबीसी वा अन्य कुठल्याही संवर्गात बसू शकत नाही. तरुण पिढीची दिशाभूल करून चालणार नाही. राज्यात जातनिहाय गणना आणि आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल, अशी भूमिका रोहित पवार यांनी व्यक्त केली.