‘तपासादरम्यान पीडिता व त्यांच्या कुटुंबीयांशी सौजन्याने वागावे, तपासात उणिवा न ठेवता आरोपीस तत्काळ अटक करावी. गुन्ह्यांच्या अनुषंगाने साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत. गुन्ह्यात आरोपीला मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालू नये. फिर्यादींना विश्वासात घेऊन त्यांचे न्यायालयात जबाब नोंदवावेत. आरोपी जामीनावर असल्यास त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी. गुन्ह्याचा तपास जलद गतीने करून भक्कम कायदेशीर साक्ष व पुराव्याचे आधारे मुदतीत न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे,’ असे सक्त निर्देश कलवानिया यांनी तपास अधिकाऱ्यांना दिले.
पीडितांना पोलिस अधिक्षकांची विचारणा
विविध प्रकरणात फिर्यादी असलेल्या पीडितांना पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी थेट विचारणा केली. यात पीडितांच्या सांगण्याप्रमाणेच पोलिसांनी फिर्याद घेतली आहे का, गुन्ह्यातील आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे का, गुन्हा दाखल करताना कोणी दबाब आणला आहे का किंवा आता आरोपीद्वारे काही त्रास देऊन दबाब आणण्यात येत आहे का, गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीच्या घरचे अथवा नातलग त्रास देत आहेत का; तसेच तक्रार मागे घेण्यासाठी कोणी पाठलाग करीत आहे का, तपास करणाऱ्या पोलिसांविषयी काही तक्रार किंवा आक्षेप आहे का, पीडितांना पोलिसांची आणखी काही मदत हवी का, तपासाबाबत योग्य ती माहिती पीडितांना देण्यात येत आहे का, त्यांना विश्वासात घेऊन तपास करण्यात येत आहे का,’ अशा अनेक मुद्द्यांवर पीडितांसोबत संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.
—–
विश्वास मिळाल्याची पीडितांची भावना
पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी संबंधित महिलांची विचारपूस केल्यानंतर पीडित महिला व मुलींनी भावना व्यक्त केल्या. या वेळी काहींनी नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनाच्या अनुषंगाने भावाप्रमाणे रक्षणाचे वचन दिल्याबद्दल पोलिस अधीक्षकांचे आभार मानले. ‘या वचनामुळे पीडितांसह अन्य महिला व मुलींना पोलिसांकडून न्याय मिळेल; त्यांच्यासेाबत कोणतीही घटना होणार नाही,’ असे सांगून आपुलकीची व विश्वासाची प्रेरणा मिळाल्याची भावना पीडितांनी व्यक्त केली.
