तरुणपिढी जळगावला प्रगतीपथावर नेत आहे याचा अभिमान आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा अभिमान आहे. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा ऊंच पुतळा उभारण्यात आला. आजपर्यंत कधीही भाजप आणि त्यांच्या मातृसंस्थेनं ज्याला आदर्श मानावं अशा व्यक्ती निर्माण केल्या नाहीत. ज्या वल्लभभाई पटेलांनी निजामाच्या अत्याचारातून मराठवाडा मुक्त केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मणिपूरमध्ये काय चाललंय याच्या बातम्या येत नाहीत. महिलांची विटंबना झाली त्यावर कोणी काय बोलत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० ची लगबग करत आहेत. आमचे मुख्यमंत्री तिकडे गेले आहेत, बेकायदा मुख्यमंत्री असं कोर्टाचं म्हणनं आहे. हे तिकडे गेले आहेत, बायडनशी बोलणार, ऋषी सुनक यांच्यासोबत फोटो काढला पण बोललात काय ते सांगा असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला.
इंडियाच्या बैठकीत मला तुमच्यामुळं किंमत मिळाली. त्या बैठकीनंतर गद्दारांनी आणि ज्यांनी गद्दारी करायला लावली त्यांनी होर्डिंग्ज लावली. बाळासाहेबांचा फोटो आणि मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं होर्डिंग होतं. शिवसेनेची काँग्रेस होणारचं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही पण मग होर्डिंग्ज लावलं आम्ही शिवसेनेला कमळाबाईची पालखी वाहायला देणार नाही. कमळाबाईची पालखी वाहायला म्हणून बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिलेला नाही, उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटील यांना भेटायला जायला वेळ नाही. त्यांच्याशी किमान बोलातरी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अंतरवाली सराटीतील आंदोलकांचं काय चुकलं होतं? पोलीस आले आणि मारु लागले, जालियवाला जसं घडलं होतं तसा कोणी तरी जालनावाला आलेला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.