पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीचा एक मोठा गट घेऊन भाजप आणि शिवसेना युतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी प्रथमच पुण्यात शक्तिप्रदर्शन केले. आज सकाळी अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या जिजाई येथून सकाळी ‘रोड शो’ला सुरवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे दगडूशेठ गणपती मंदिरात आरती करून स्वारगेट कात्रज मार्गे खेड शिवापूरपर्यंत हा रोड शो झाला. अजित पवार यांच्या या रोड शोला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, धनंजय मुंडे, शहराध्यक्ष दीपक मानकर हे अजित पवार यांच्यासोबत या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर अजित पवार यांचे मोठे पुत्र पार्थ पवार हे देखील या संपूर्ण रोड शोमध्ये अजित पवार यांच्यासोबत होते. वडिलांच्या या नव्या वाटेवर खांद्याला खांदा लावून उभे राहिल्याने पार्थ पवार यांची उपस्थिती ही या रोड शोमध्ये विशेष चर्चेचा विषय होती. कोल्हापूरमध्ये शरद पवार यांनी घेतलेल्या तुफानी सभेनंतर अजित पवार आज कोल्हापूरमध्ये उत्तरदायित्व सभा घेत आहेत. त्या सभेला जाण्यापूर्वी पुण्यात अजित पवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आणि या शक्तिप्रदर्शनात पार्थ पवार यांची एंट्री विशेष लक्षवेधक ठरली.
ठाण्यात मोठी दुर्घटना: ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली, ६ कामगारांचा मृत्यू
पार्थ पवार हे वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिल्याने पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, या ठिकाणी त्यांचा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर पार्थ पवार कुठेतरी सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता अजित पवारांनी भाजपची साथ देत नवी वाट निवडल्यानंतर या वाटेवर पार्थ पवार हे अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे पाहायला मिळते.
पार्थ पवार यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव झाला होता. त्याचे शल्य अजूनही पवारांना बोचत आहे. आज पुण्यात पार्थ पवार हे रोड शोमध्ये दिसल्याने पार्थ पवारांनी आगामी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं बोललं जातं आहे.