• Tue. Nov 26th, 2024

    दुष्काळी सिन्नरला ‘सुजलाम् सुफलाम्’चे वेध; दमणगंगा-देव नदीजोड प्रकल्पाचा अंतिम अहवाल सादर

    दुष्काळी सिन्नरला ‘सुजलाम् सुफलाम्’चे वेध; दमणगंगा-देव नदीजोड प्रकल्पाचा अंतिम अहवाल सादर

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सिन्नर तालुक्यात साकारणाऱ्या ५.६ टीएमसी क्षमतेच्या दमणगंगा-वैतरणा-कडवा-देव या नदीजोड प्रकल्पाचा अंतिम प्रकल्प अहवाल नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने राज्य सरकारला सादर केला आहे. त्यामुळे दुष्काळी सिन्नर तालुक्यातील सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागून तो सुजलाम सुफलाम होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

    सिन्नरमधील १३ हजार ८०० हेक्टर जमीन या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर भविष्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. वैतरणा-दमणगंगा-कडवा-देव या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पासाठी साडेसात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सिन्नर तालुक्याला वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी हा नदीजोड प्रकल्प साकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पातून वैतरणा खाडीतून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून हे पाणी गोदावरी खोऱ्यात टाकल्यास सिन्नर तालुक्यासाठी साडेसहा टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल. या नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याची जबाबदारी सरकारने नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अॅथॉरिटीकडे सोपविली होती. त्यांच्याकडून ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, नदीजोड प्रकल्पाचा अंतिम अहवालही शासनाला सादर केला आहे. या प्रकल्पासाठी पाणी उचलण्यासाठी लागणाऱ्या विजेची गरज भागविण्यासाठी १३० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा खर्चही या सविस्तर प्रकल्प अहवालात समाविष्ट करण्यात आला आहे.

    …या कामांचे नियोजन

    सविस्तर प्रकल्प अहवालात विविध कामांचा समावेश आहे. दमणगंगा व वैतरणा खोऱ्यातील निळमाती, मेट, कोशिमशेट, उधळे येथे बंधारे बांधणे, ऊर्ध्व वैतरणा-कडवा ते बोरखिंड धरणांचा उपयोग करून पाणी वळविणे, या चार जलाशयांमधील पाणी वैतरणा धरणात आणून तेथून २८ किलोमीटर पाइपने कडवा धरणात टाकणे, बोरखिंड ते देव नदीदरम्यान पाइपलाइन व बोगद्याद्वारे पाणी सिन्नर तालुक्यात देव नदीच्या उगमस्थानापर्यंत आणून तेथून ते सिन्नरच्या पूर्व भागापर्यंत नेण्याचे नियोजन आहे.
    नाशिक जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन यंदा घटणार; पुरेशा पावसाअभावी मत्स्यबीज संचयन हंगाम वाया
    …असा होणार पाणी वापर

    सिंचनासाठी : ३६०० दशलक्ष घनफूट
    पिण्यासाठी : ८४७ दशलक्ष घनफूट
    उद्योगासाठी : ८३८ दशलक्ष घनफूट

    …असा आहे प्रकल्प

    प्रकल्पाची एकूण लांबी ८३.२ किलोमीटर
    ऊर्ध्वगामी जलवाहिनीची लांबी : ४१.६९ किलोमीटर
    बोगद्यांची लांबी १६.९४ किलोमीटर
    विजेची गरज : १२६ मेगावॅट
    पाणी उपलब्धता : ५६०० दशलक्ष घनफूट
    भूसंपादन : १३९४ हेक्टर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed