बोगद्यातील रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून बोगद्यामध्ये लाईट बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच रस्त्यावरही ‘कॅट आय’ बसवण्याचे काम सुरू आहे. बोगद्यामध्ये प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर आपत्कालीन प्रसंगात वाहन बाजूला घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या बोगदाचे काम रिलायन्स व अन्य कंपनी करत आहे. सुरू केली जाणाऱ्या एका मार्गीकेचे काम युद्धपातळीवर पूर्णत्वाकडे गेले आहे. या सगळ्या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून लक्ष ठेवले जात आहे.
अत्याधुनिक बुमर तंत्रज्ञानाचा वापर
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे तर खेड तालुक्यातील कशेडी दरेकरवाडीपर्यंत डोंगराच्या आतून दोन बोगदे खोदण्यात आले आहेत. कशेडी घाटाच्या खालील बाजूस बोगद्याची खोदाई अत्याधुनिक बुमर तंत्र वापरून करण्यात आली आहे. बोगद्याची २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची आहे.
या बोगदयाच्या महत्त्वाच्या कामासाठी एकूण ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला असून ३५० कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आला आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी करण्यात आला आहे यात दोन भुयारी मार्ग आहेत. यातील कोकणाकडे जाणारी एक मार्गिका सुरू होणार आहे. नियोजनानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा हा पक्का रस्ता बोगद्यात असणार आहे.
कोकणातून पुन्हा मुंबईकडे जाताना कशेडी घाट टाळायचा असल्यास चाकरमान्यांना रत्नागिरीतून राई भातगाव मार्गे शृंगारतळी येथून धोपावे दाभोळ येथील फेरीबोट मार्गे दापोली जाता येईल आणि दापोली येथून लाटवण महाड मार्गे मुंबई गोवा महामार्गावरून पुढे प्रवास करता येऊ शकतो. गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या पर्यायी मार्गाचा वापर केल्यास परतीच्या प्रवासातही कशेडी घाट टाळता येऊ शकतो.