दरम्यान शेतकरी सतत निसर्गाशी झगडून आपले पीक वाचवण्याचा प्रयत्न करतो. यंदा मात्र निसर्गाने शेतकऱ्याचे सोयाबीन पीक हिरावले आहे. यामुळे शोकाकुल झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आसेगावदेवी ता. बाबुळगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क ‘शोक संदेश’ पत्रिका छापून सोयाबीन राव यांचे ३० ऑगस्ट रोजी निधन झाले असून दशक्रियेचा नेम मंगळवार ५ सप्टेंबरला तर शुद्ध पंक्तीचा नेम १३ सप्टेंबरला ठेवला आहे, असा ‘शोक संदेश ‘असणारी पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाभूळगाव तालुक्यातील आसेगावदेवी परिसरातील सोयाबीनची स्थिती बिकट आहे.
विहिरीतील पाण्याने सिंचन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सतत खंडित होत असलेल्या विजेचे आव्हान निर्माण झाले आहे. वीजपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून गावकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या. पण, वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. आता पिकाने माना टाकल्या आहेत. ही स्थिती पाहून संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन मृत झाल्याचे जाहीर केले. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पत्रिका छापून माहिती दिली जाते. तशीच पत्रिका सोयाबीनचीही प्रकाशित करण्यात आली आहे. ‘सोयाबीनराव यांना ३० ऑगस्टला देवाज्ञा झाली. ५ सप्टेंबरला दशक्रिया, १३ सप्टेंबरला शुद्ध पंगतीचा नेम ठरविण्यात आला आहे,’ असे पत्रिकेवर नमूद आहे. विनीत म्हणून तूर, कपाशी असे दाखविण्यात आले आहे.
दुसरीकडे सोयाबीन फुल आणि कळ्यांच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगाची चरपट धरलेली आहे. पाऊस नसल्याने ही पीके पिवळी पडत आहे.अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. कोमेजलेल्या अवस्थेतील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाऊस नसल्याने शेतशिवाराला मोठा धोका निर्माण होणार आहे. अचानक गायब झालेल्या पावसाने शेत जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. उन्हाच्या तीव्रतेने जमिनीतील ओलावा वेगाने कमी झाला आहे. त्यामुळे शेतातील पिके सुकत आहे. वेळेपूर्वी पाऊस न बरसल्यास शेंगाचे टरफल शिल्लक राहतील त्यामध्ये दाणे भरणार नाहीत. ज्वारी इतकी बारीक दाने निर्माण होईल. त्यामुळे उत्पन्नाचा मोठा प्रमाणात घट होण्याचा अंदाज आहे. कपाशीला पावसाचे नितांत गरज आहे. मात्र पाऊस नसल्याने कापसाच्या पिकांनाही माना टाकले आहेत. या ठिकाणी झाडाला लागणाऱ्या पात्या गळून पडत आहे. वेळेपूर्वी पात्यांची गळ झाल्याने एकरी पावसाच्या उत्पादनाला त्याचा फटका बसणार आहे.