माटुंगा येथील अजित पटेल हा तरूण रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेला दोघे त्याच्याकडील ३५ लाखांची रोकड घेऊन पसार झाले. अजित तक्रार घेऊन येताच माटुंगा पोलिसांनी तत्काळ तपास करून काही तासात गुन्ह्याचा छडा लावला. पण प्रत्यक्षात लूट झालीच नसून अजितनेच हा बनाव रचल्याचे समोर आले. नवीन घरासाठी रकमेची व्यवस्था होत नसल्याने त्याने वेळ मारून नेण्यासाठी हे कृत्य केले.
अंधेरी येथे वास्तव्यास असलेला अजित पटेल हा बुधवारी माटुंगा पोलिस ठाण्यात आला. नप्पू रोडवरील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ३५ लाख रूपये ठेवलेली बॅग पळविल्याचे सांगितले. इतकी मोठी रक्कम दिवसाढवळ्या लुटण्यात आल्याने वरिष्ठ पोलिस निरिक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माटुंगा पोलिसांनी लगेच लुटारूंचा शोध सुरू केला. अजित याने सांगितलेल्या घटनास्थळी पोलिस पोहोचले. येथील आजूबाजूचे सीसीटीव्ही बारकाईने तपासण्यात आले. या ठिकाणी अशी कोणती लूट झाल्याचे दिसले नाही. यामुळे संशय आल्याने पोलिसांनी अजितचा मोबाइलचा तांत्रिक तपास केला. तांत्रिक विश्लेषणात हा संशय अधिक बळावला.
पोलिसांनी अजितला ताब्यात घेऊन त्याची उलटसुलट चौकशी केली. उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अजित समोर तांत्रिक पुरावे ठेवण्यात आले. त्यावेळी चालक करण सावंत याच्या मदतीने लुटीचा बनाव केल्याची कबुली दिली. एका फ्लॅटचा खरेदी व्यवहार झाला होता. मालकाला बुधवारी ३५ लाख रूपये देण्याचे ठरले होते. रक्कम न दिल्यास हा सौदा फिस्कटणार होता. पैशाची व्यवस्था न झाल्याने आणि मालकाची सहानुभूती मिळविण्यासाठी त्याने हा बनाव रचल्याचे सांगितले.