राज्यातल्या बऱ्याच भागांना यंदा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अशात हवामान खात्याकडून एक दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत राज्यातील पावसात सुधारणा होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
२ दिवसांत राज्यात पावसाचा जोर
डॉ. होसळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर या दोन दिवसात राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळेल. यावेळी वातावरणामध्ये हलकासा गारवाही असेल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तसेच विदर्भातही समाधानकारक पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारपर्यंत राज्यातल्या कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट असणार आहे. यावेळी सर्वच भागात मुसळधार पाऊस पडेल तर ७ सप्टेंबरला विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे-कुठे पावसाची शक्यता…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भामधील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल. तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट यावेळी जारी करण्यात आला आहे.