• Mon. Nov 25th, 2024

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    ByMH LIVE NEWS

    Sep 6, 2023
    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई, दि. 06 : राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तातडीने नावनोंदणी करुन यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी करण्याचा अंतिम दिनांक हा 15 सप्टेंबर, 2023 असा आहे.

    राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ई- मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक संतोष रोकडे यांनी दिली आहे.

    राज्यात सन 2022 मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन 2023 मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांव्यतिरिक्त उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

    या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्य, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेले कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता अशा विविध निकषांसाठी गुणांकन दिले जाणार आहे.

    विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.

    अधिक माहितीसाठी नोंदणीकृत गणेश मंडळांनी संपर्क क्रमांक 8169882898, 022-243122956 / 022-24365990 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत ( सकाळी 10 ते सायंकाळी 6) अथवा स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    ००००

    दीपक चव्हाण/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed