मतदार पडताळणी मोहीम
राज्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून मतदार केंद्रांची संख्या वाढवून मतदारांची संख्या कमी करण्याचे आदेश जारी केले आहेत. राज्यात सध्या मतदार पडताळणीची मोहीम सुरू आहे. ही मोहीम १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. मतदार पडताळणीपाठोपाठ आता मतदान केंद्राचे सुसूत्रीकरणाची मोहीम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे.
एकाच सोसायटीतील मतदार एका केंद्रावर
एका मतदान केंद्रावर बाराशे मतदार असतील. त्यापेक्षा जास्त मतदारांना इतर ठिकाणी मतदान केंद्र देण्यात येणार आहे. हे मतदान केंद्र देताना त्या मतदान केंद्रातील एक विशिष्ट भाग दुसऱ्या मतदान केंद्रात हलविला जाणार आहे. हे मतदार हलविताना यादीतील बाराशेपेक्षा जास्त मतदार न हलविता तेथील विशिष्ट भागच हलविला जाणार आहे. त्यामुळे एका सोसायट्यांमधील मतदार एकाच मतदान केंद्रात असतील, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे मतदारांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच जुन्या मतदान केंद्रात सुविधा अपूर्ण असल्यास नवीन ठिकाणी त्या सुविधा मिळाल्यास अशा मतदान केंद्राना नवीन जागेत हलविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान राज्यात राबविली जाणार आहे.
राज्यात मतदार केद्रांच्या सुसूत्रीकरणामध्ये बाराशेपेक्षा जास्त मतदार एका केंद्रावर मतदान करणार नाहीत. बाराशेपेक्षा जास्त मतदार असल्यास स्वतंत्र मतदान केंद्र निर्माण केले जाईल.
– श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी
१७ ऑक्टोबरला प्रारुप आराखडा प्रसिद्ध
मतदार पडताळणीची मोहीम संपल्यानंतर १६ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान, मतदार याद्यांची दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, नावे वगळणे पत्त्यात दुरुस्ती, फोटो बदलणे अशी कामे केली जाणार आहेत. त्यानंतर १७ ऑक्टोबरला मतदार यादीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान पुन्हा नवीन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. विशेष ग्रामसभा, शिबिरे, महाविद्यालयांमध्ये नोंदणी मोहीम अशा स्वरूपाच्या उपक्रमांतून नवमतदार जोडले जाणार आहेत. त्यानंतर पाच जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. ही मतदार यादी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे, असेही निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.