• Sat. Sep 21st, 2024
‘खाकी’च असुरक्षित; महिला पोलीस निरीक्षकावर पोलिस चौकीत हल्ला, पुण्यात खळबळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे: मुंबईतील पोलिस दलाच्या फोर्स वन पथकातील पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस निरीक्षक महिलेला मारहाण केल्याची घटना नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) अभिरुची पोलिस चौकीच्या आवारात घडली. या प्रकरणी नीलेश भालेराव (रा. कलिना, सांताक्रुझ, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी नीलेश भालेराव मुंबईतील फोर्स वन पथकात नियुक्तीस आहे. तक्रारदार पोलिस निरीक्षक महिला राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्तीस होती. २०१८मध्ये भालेराव प्रशिक्षणासाठी आला होता. त्या वेळी त्याने तक्रारदार पोलिस निरीक्षक महिलेशी वाद घातला होता. शासकीय कामात अडथळा; तसेच विनयभंग केल्याप्रकरणी भालेरावविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेने याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात भालेरावविरुद्ध तक्रार दिली होती. भालेरावच्या कुटुंबीयांनी महिलेला विनंती केल्याने भालेरावविरुद्ध दाखल तक्रार मागे घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर भालेरावने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली.

जालन्यात पोलिसांकडून लाठीचार्ज तर आंदोलकांकडून दगडफेक, आंदोलक अन् पोलीस जखमी

पोलिस निरीक्षक महिला आणि तिचा पती अभिरुची पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपी भालेराव तेथे आला. त्याने पोलिस निरीक्षक महिलेशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. भालेरावविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी विनयभंग तसेच धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक भारत चंदनशिव तपास करीत आहेत.

प्रदीप कुरुलकरने २४ तासांत डेटा केला डिलीट? ATSला अद्याप ‘त्या’ डेटाची प्रतीक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed