सकल मराठा समाजाने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये बंद पुकारला. सकाळपासूनच शहरातील दुकाने बंद होती. एसटी महामंडळाच्या बसेस रस्त्यावर दिसत नव्हत्या. बाजारपेठ ओस पडली होती. खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. केवळ वैद्यकीय सेवा व पेट्रोलपंप सुरू होते. दुपारच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा समाजबांधवांनी धरणे आंदोलन करून सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. ढाणकी, मुळावा, पोफाळी येथेही बंद पाळण्यात आला. दिग्रस येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मानोरा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पुसद, यवतमाळ, अकोला, अमरावतीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. नेरमध्येही मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मराठा सेवा संघाच्या अमरावती जिल्हा शाखेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. आंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधवांवर झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या. तर दुसरीकडे आजाद समाज पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला.
अन् अनर्थ टळला!
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजातील राजवाडा येथून सोमवारी मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानकावर आल्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यानंतर मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचताच आंदोलकांमधील गव्हाड हे भाषण संपताच हातात पेट्रोल भरलेली बाटली घेऊन तहसीलदारांच्या केबिनकडे पळत सुटले. पोलिसांनी त्यांना तत्काळ अडवून प्रतिबंधात्मक कारवाई केली. तहसीलदार सचिन जयस्वाल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सतीश तायडे, शिवाजीराजे जाधव, देविदास ठाकरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.