बबनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता पाचपुते यांच्या राजकारणात सदाअण्णा पाचपुते यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा साजन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. पाचपुते यांनी त्यांना गृहित धरून राजकारण केले. आपल्या मुलाला राजकारणात आणले. मात्र, साजन यांना हे पटले नसावे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत साजन विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली. त्यामध्ये आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळवत राजकारणात स्वतंत्रपणे प्रवेश केला.
त्यानंतर साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकली. गावचे सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते. अलीकडेच राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सर्व पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. पक्षात पडलेले गट आणि त्यातून निर्माण झालेली चुरस यामुळे अनेकांना संधी दिसू लागली आहे. तर दुसरीकडे पक्षही नव्या उमेदवारांच्या शोधात आहेत. अशातच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून पाचपुते यांची मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली होती. तर काही दिवसांपूर्वीच पाचपुते यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही भेट झाली होती. मात्र ही भेट राजकीय नव्हे तर कामासाठी असल्याचे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.
त्यानंतर आता साजन पाचपुते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. याला त्यांच्याकडूनही दुजोरा देण्यात आलेला आहे. आज सोमवारी सायंकाळी मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर पाचपुते यांच्यावर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि भाजपचे वर्चस्व वाढत असलेल्या नगर जिल्ह्यात ठाकरे यांची शिवसेना पिच्छाडीवर पडली होती. त्यादृष्टीने पक्षाबांधणीला सुरवात करीत नवीन चेहरे पक्षात आणण्यास सुरवात केल्याचे दिसून येते. पाचपुते यांच्या रुपाने पक्षाला श्रीगोंदा तालुक्यात आणि जिल्ह्याच्या दक्षिण भागातही नवे तरुण नेतृत्व मिळाले आहे.