• Thu. Nov 28th, 2024
    पुणेकरांसाठी गुड न्यूज; आकाशवाणी पुणे लवकरच एफएमवर, खरखर आवाजाची तक्रार होणार इतिहासजमा

    पुणे : आकाशवाणीचे पुणे केंद्र लवकरच मध्यम लहरी अर्थात ‘मीडियम वेव्ह’ऐवजी ‘फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन’ म्हणजेच ‘एफएम’वरून ऐकता येणार आहे. पुणेकरांची ही दीर्घकालीन मागणी लवकरच पूर्ण होणार असून, पुणेकरांना आधुनिक स्वरूपाच्या ‘एफएम रेनबो’ या नव्या केंद्राचीही भेट मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मध्यवर्ती भागासह उपनगरांत कार्यक्रम ऐकू न येणे, खरखर अशा तक्रारी इतिहासजमा होतील.

    प्रक्षेपणात येणारे अडथळे आणि रेडिओ प्रक्षेपण तंत्रज्ञानात झालेल्या बदलांच्या व रसिक श्रोत्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीचे पुणे केंद्र ‘मीडियम वेव्ह’ऐवजी ‘एफएम’वर स्थलांतरित करावे, त्यासाठी नवे प्रक्षेपक (ट्रान्समीटर्स) उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पुणे केंद्रातर्फे प्रसारभारती व माहिती प्रसारण मंत्रालयाकडे करण्यात आली होती. या मागणीला प्रसारभारतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुणे केंद्र ‘एफएम’वर येण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे.

    गेल्या काही वर्षांत प्रसारण तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाले आहेत. मीडियम वेव्हवर चालणारे प्रसारण प्रामुख्याने रेडिओ सेट्सवरून ऐकले जाते. परंतु, हळूहळू रेडिओ सेट्स कालबाह्य होत आहेत. प्रसारणातील अडथळ्यांमुळे नागरिकांना व्यत्यय सहन करावा लागतो. ‘एफएम’वरील प्रसारण सर्व प्रकारच्या (इंटरनेट नसलेल्या) मोबाइलवरून तसेच छोट्या साध्या रिसिव्हरवरूनही ऐकता येते. त्यामुळेच हे केंद्र ‘एफएम’वर स्थलांतरित करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

    ३२ देश, ३० हजार किमीचा रस्ता, १२० दिवसांचा प्रवास; पुण्यातलं मराठी कुटुंब निघालं कारने लंडनला

    मोबाइल फोनचा वाढता वापर तसेच अन्य कारणांमुळे हवेत ध्वनी लहरींची दाटी होते. त्यामुळे मध्यम लहरींवर चालणाऱ्या प्रक्षेपणात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे मीडियम वेव्हजवर चालणारी केंद्रे एफएम वाहिन्यांमध्ये परावर्तित करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने २०१४मध्ये घेतला होता. याबाबतची घोषणा तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.

    पुणेकर श्रोत्यांकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात होता. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्राने प्रसारभारतीला २५०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून नव्या केंद्रांची, वाहिन्यांची निर्मिती होण्यास मदत होणार आहे. त्यातच पुण्याला लवकरच हे ट्रान्समीटर उपलब्ध होतील. त्यामुळे पुणेकरांसह अनेक ठिकाणच्या पुणे केंद्राच्या नियमित श्रोत्यांना ‘एफएम’वरून पुणे केंद्राचे प्रसारण ऐकण्याचा आनंद घेता येईल.

    काही महिन्यांपूर्वी आम्ही पुणे केंद्राचे ‘एफएम’वर रूपांतर, तसेच एक एफएम रेनबो व एक एफएम गोल्ड वाहिनीसाठीची मागणी वरिष्ठांकडे केली होती. ही मागणी विचाराधीन असून, यथावकाश दोन नवे एफएम ट्रान्समीटर पुणे केंद्राला प्राधान्याने उपलब्ध करून दिले जातील, असे कळविण्यात आले आहे.

    – इंद्रजित बागल, केंद्र संचालक, पुणे आकाशवाणी

    गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ पाटी; संशय येताच पोलिसांनी गाडी अडवली, कोट्यवधींचा गांजा जप्त

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed