• Sat. Sep 21st, 2024
पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल, मनोज जरांगेची ताकद ओळखण्यात चूक,  मराठा आंदोलन कसं पेटलं?

सुरेश केसापूरकर, जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र झालेल्या अंतरवाली सराटीमधील (ता. अंबड, जि. जालना) वातावरण सामाजिक एकजुटीसह निर्धारपूर्वक संघर्षाचा स्रोत झाले आहे. गोदावरीच्या काठावरील शेकडो गावातील युवक, महिला, शेतकरी, नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त सक्रिय सहभाग या आंदोलनाचा मजबूत पाया झाला आहे. विविध राजकीय पक्ष आणि मतप्रवाह असलेली मंडळी आंदोलनात आरक्षणाच्या एकाच ध्येयाने काम करताना दिसत आहेत.

मनोज जरांगे पाटील हे शहागड (ता. अंबड) येथील सामान्य शेतकरी. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा संदेश गावोगावी पोहोचवण्यासाठी अनेक वर्षांपासून ते प्रयत्नशील आहेत. त्यांनी यापूर्वी साष्टपिंपळगांव, वडीकाळ्या, शहागड, जालना या गावांत उपोषण, आंदोलने केली आहेत. त्यांनी ‘शिवबा’ या नावाने संघटना स्थापन केली असून, या संघटनेच्या माध्यमातून ते युवकांना जोडण्याचे काम करतात.

घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांच्या या भागातील आंदोलनाचा जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला अजिबात अंदाज आला नाही. जरांगे यांच्या शहागड येथील जनआक्रोश आंदोलनास मिळालेला प्रतिसाद पोलिसांनी लक्षात न घेता केलेल्या कारवाईची वेळ चुकली. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा सपशेल अपयशी ठरली. आंदोलनस्थळी शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या लाठीमार केला आणि त्याचा राज्यभर निषेध सुरू झाला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. सरकार समोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, अशी भावना व्यक्त होत आहे.

सरकारने मराठा आरक्षणाबाबत ती चूक टाळली असती तर जालन्यातील उद्रेक झालाच नसता? नवी माहिती समोर

‘जरांगे यांच्यासोबत दोन दिवस प्रशासन आणि पोलिसांच्या सोबत समजुतीच्या स्तरावर चाललेल्या चर्चेतून नक्कीच मार्ग निघाला असता; मात्र घाईघाईत पोलिस बळाचा वापर करून जरांगे यांना नेण्याची अजिबात गरज नव्हती. त्याचा गंभीर परिणाम सर्वत्र दिसत आहे. राजकीय नेत्यांकडून होत असलेला हस्तक्षेप समाजातील कुणालाच आवडत नाही,’ असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयमंगल जाधव यांनी व्यक्त केले.

जरांगे यांनी पूर्वी केलेल्या उपोषणाचा इतिहास पोलिसांनी बघितला असता, तर कदाचित आज जे चित्र निर्माण झाले ते नक्कीच टळले असते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी बोलून दाखवली.

Devendra Fadanavis: फडणवीसांच्या संकटमोचकांना अपयश; उपोषण सोडण्यासाठी गेलेल्या महाजनांना जरांगे पाटलांचे २ पर्याय

शहरासह जिल्ह्यात आज बंद

जालना येथील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने हा बंद पुकारला आहे.

आंतरवाली प्रकरणानंतर जालन्याच्या पोलिस अधीक्षकाचे निलंबन, आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका यासह विविध विषयांवर भूमिका मांडण्यात आली. या मागण्यांसाठी बंद पाळण्यात येणार आहे. ‘या बंदमध्ये सर्वांना सोबत घेण्याचा मराठा संघटनांचा प्रयत्न असून, इतर समाजांनाही बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत,’ असे विनोद पाटील यांनी सांगितले.

शाळा, महाविद्यालयांनाही सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात आली आहे. जालन्यातील पोलिस अधीक्षकास बडतर्फ करण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. औरंगाबाद मुद्रक संघाने या बंदला पाठिंबा दिला आहे. व्यापारी महासंघ कोणत्याही राजकीय, सामाजिक बंदला पाठिंबा देत नाही. मात्र, व्यापारी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवू शकतात. त्याला आमचा आक्षेप नसल्याचे व्यापारी महासंघाने रविवारी घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले. मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा असल्याचे आंबेडकरी चळवळीने जाहीर केले आहे. विविध आंबेडकरी पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढून पाठिंबा दिला आहे. शाळा-महाविद्यालयेही सोमवारी बंद राहणार असल्याचे शाळा प्रशासनाने जाहीर केले आहे. पालकांना रविवारी मेसेजेस पाठवून शाळा बंद असल्याची सूचना देण्यात आली आहे.

उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहारही सोमवारी बंद राहणार आहेत. भाजीपाला विक्रेत्यांनी सकाळी दहापर्यंत विक्री करून नंतर बंदला सहकार्य करावे, असे आवाहन सभापती राधाकिसन पठाडे यांनी केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिल्याचे पांडुरंग तांगडे यांनी सांगितले.

परीक्षार्थींना दिलासा

सध्या तलाठी भरती परीक्षा सुरू असून, काही विद्यार्थ्यांची सोमवारी परीक्षा आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. याबाबत मराठा संघटनांनी भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. हा बंद शांततेत राहणार असून, नागरिकांना त्रास होणार याची काळजी घेऊ, असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज, चंद्रकांत पाटलांचं मौन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed