• Mon. Nov 25th, 2024

    जिल्ह्यात बंद; शहरात संमिश्र! जालन्यातील लाठीमाराचा नाशिकमध्ये निषेध, या मार्गाने गेला मोर्चा

    जिल्ह्यात बंद; शहरात संमिश्र! जालन्यातील लाठीमाराचा नाशिकमध्ये निषेध, या मार्गाने गेला मोर्चा

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहराच्या मुख्य बाजारपेठांमधील काही व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली. परंतु, अनेक व्यावसायिकांच्या आस्थापना खुल्याच होत्या. दुपारी चारनंतर बाजारपेठा पूर्णत: खुल्या झाल्याने ग्राहकांची वर्दळही वाढली.

    विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे जालना येथे आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलकांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. मराठा आरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याचा नाशिक हा केंद्रबिंदू राहिला असल्याने येथेही दोन दिवसांपासून पडसाद उमटत आहेत. मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. ३) नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्याने नाशिक बंद दरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिस उपायुक्तांसह, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षकांचा फौजफाटा कर्मचाऱ्यांसह बंदोबस्तासाठी शहरात ठिकठिकाणी उतरविण्यात आला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास सकल मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सुनील बागुल, दत्ता गायकवाड, करण गायकर, अॅड. शिवाजी सहाणे, देवानंद बिरारी, विलास शिंदे, महेश बडवे यांच्यासह कार्यकर्ते सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमले. तेथून मोर्चा काढून दुकाने खुली ठेवणाऱ्या व्यावसायिकांना आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चेकरी मार्गस्थ झाले. ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ यांसारख्या घोषणा देत हा मोर्चा पुढे जात होता. दुकाने दुपारी चारपर्यंत बंद ठेवण्याची विनंती व्यावसायिकांना करण्यात येत होती. हा मोर्चा पुन्हा शिवाजी महाराज पुतळ्याजवळ परतला. जालना येथील पोलिस अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर लवकरच मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेतली जाईल, असे गायकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.

    या मार्गाने गेला मोर्चा

    सीबीएस सिग्नल-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-नेहरू गार्डन-संत गाडगे महाराज पुतळा-मेनरोड-धुमाळ पॉइंट-रेडक्रॉस सिग्नल-महात्मा गांधी रोड-मेहेर सिग्नल-हुतात्मा स्मारकमार्गे सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला.
    जालन्यात मराठा आंदोलकांकडून बंद, ३५० आंदोलकांविरुद्ध गुन्हा, दिवसभरात काय घडलं?
    पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना रोखले

    व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करीत मोर्चेकरी पुढे चालले होते. हा मार्चा नेहरू गार्डनकडून मेनरोडकडे जात असताना मार्गात पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडविले. मेनरोडकडे जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला. आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला आहे. दुकाने बंद ठेवावीत, एवढेच आवाहन आम्ही व्यावसायिकांना करीत आहोत. आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करून आंदोलन करणारे लोक आहोत. त्यामुळे आम्हाला जाऊ द्यावे, अशी विनंती मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर या मोर्चेकऱ्यांना पुढे सोडण्यात आले.
    जुने नाशिक : जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे रविवारी (दि. ३) पुकारण्यात आलेल्या बंदला जुन्या नाशिक येथील फाळकेरोड, दूध बाजार, चौक मंडई तसेच वडाळारोड भागात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. काही ठिकाणी दिवसभर व्यावसायिकांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली, तर भद्रकाली परिसर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड येथे सकाळी काही काळ व्यवसायिकांनी दुकाने बंद केली होती, दुपारनंतर उघडण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed