पैठणमध्ये जाळले टायर
पैठण : सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात बैठक घेतली. सराटी येथील घटनेचा निषेध केला. राज्य सरकार व लाठीमार करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी आपला रोष व्यक्त करत घोषणा दिल्या. संतप्त आंदोलनकर्त्यांनी रस्त्यामध्ये टायर जाळत आपला रोष व्यक्त केला. सकाळपासून पैठण एसटी बस स्थानकातून एकही बस रस्त्यावर आली नाही. शाळा, महाविद्यालयातील उपस्थितीवरदेखील परिणाम जाणवला. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तालुक्यातील तुळजापूर, आडूळ, निलजगाव, विहामांडवा येथेही बंद पुकारण्यात आला. आज, रविवारी पैठण बंदची हाक देण्यात आली आहे.
गंगापूरमध्ये रास्ता रोको
गंगापूर : संतोष जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्त्यांनी गंगापूर-लासूर स्टेशन राज्य महामार्ग ३९ शेकटा फाटा येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करा, मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला. लासूर स्टेशन रोड येथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अजित जाधव, राजेक सय्यद यांच्यासह आंदोलनकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव पेठ, शिऊर पोलिस स्टेशन हद्दीतील शिऊर, लोणीगाव, वीरगाव येथील महालगाव येथेही निषेध आंदोलन करण्यात आले.