• Mon. Nov 25th, 2024

    विद्यार्थ्यांच्या गुणदानात हलगर्जीचा ‘अवगुण’ महागात; प्राध्यापकांचा दंड लाखोंच्या घरात जाणार

    विद्यार्थ्यांच्या गुणदानात हलगर्जीचा ‘अवगुण’ महागात; प्राध्यापकांचा दंड लाखोंच्या घरात जाणार

    नाशिक : लवकर निकाल जाहीर करण्याच्या दबावामुळे विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाकडे पाठविताना झालेल्या चुका प्राध्यापकांना चांगल्याच महागात पडणार आहेत. प्रत्येक चुकीसाठी एक हजाराचा दंड हा नियम लागू असल्यामुळे यंदा ही दंडाची रक्कम लाखोंच्या घरात जाणार आहे. यामुळे विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांवर मात्र अन्याय होण्याची शक्यता आहे.

    महाविद्यालयीन परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षेचे, तसेच तोंडी परीक्षेचे गुण महाविद्यालयाकडून विद्यापीठाकडे जाणे गरजेचे असते. त्यानंतर विद्यापीठामार्फत निकाल जाहीर केला जातो. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चे विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि परीक्षा या दोन्ही गोष्टी यंदा विलंबाने झाल्या. उच्च शिक्षण संचालनालयाने लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याची सूचना दिल्यानंतर विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांना तातडीने विद्यापीठाकडे गुण पाठविण्याची सूचना केली होती. या गडबडीत यंदा अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाकडे पाठविताना चुका झाल्या असून, त्याचा मोठा फटका या प्राध्यापकांना बसण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांचे गुण कळविताना झालेल्या चुकीसाठी संबंधित प्राध्यापकाला एक हजार रुपये दंड केला जातो. विद्यापीठाला गुण कळविण्याच्या गडबडीत यंदा अशा अनेक चुका झाल्या आहेत. जिल्ह्यातील नामपूर परिसरातील एका महाविद्यालयात अशा ८९ चुका झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यांचा विचार करता प्रत्येक चुकीसाठी एक हजार ही दंडाची रक्कम लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अनेक प्राध्यापक याला विरोध करीत असून, विद्यापीठाकडून निकालात दिरंगाई किंवा चूक झाल्यास संबंधितांकडून दंड का आकारला जात नाही, असा प्रश्नही प्राध्यापकांमधून उपस्थित होत आहे.
    नाशिककरांनो खबरदार! अनधिकृत झाडे तोडाल तर, चढावी लागेल कोर्टाची पायरी, कारवाई ऑन द स्पॉट
    अशी आहे प्रक्रिया

    – गुणांबाबतची चूक समोर आल्यानंतर संबंधित प्राध्यापकाला विद्यापीठात बोलावून चुकीची कबुली घेतली जाते
    – त्यानंतर संबंधित महाविद्यालयाला माहिती दिल्यानंतर प्राध्यापकाला दंड भरण्याचे दिले जातात आदेश
    – प्राध्यापकालाच विद्यापीठात जाऊन भरावी लागणार दंडाची रक्कम

    पगारापेक्षा दंड मोठा

    विविध महाविद्यालयांमध्ये विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. अवघ्या १० ते १५ हजारांवर काम करणाऱ्या या प्राध्यापकांना दंड भरावा लागल्यास विद्यापीठात येण्या-जाण्याचा खर्च व दंडाच्या रकमेसह त्यांना हे नक्कीच महागात पडणार आहे.

    ‘सकारात्मक निर्णय घेऊ’

    याबाबत विद्यापीठाशी संपर्क साधला असता, कोणावरही अन्याय केला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. हा निर्णय परीक्षा विभागाचा नसून, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा आहे. त्यामुळे योग्य त्या प्राधीकरणापुढे हे प्रकरण ठेवून, सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. मात्र, विद्यापीठ नेमका कोणता सकारात्मक निर्णय घेणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed