सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी हे घाटमाथ्यावरचे तालुके आहेत. याठिकाणी पर्ज्यन्यमान कमी होत असल्यानं हे दोन तालुके दुष्काळी म्हणून ओळखले जातात. याच घाटमाथ्यावर चार हजार लोकसंख्या असलेलं रेवणगाव हे गाव आहे. सचिन मुळीक हे या गावचे विद्यमान सरपंच आहेत. टेंभू योजनेच्या पाण्यावर तालुक्यातील बहुतांशी शेती होते. यावर्षी सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाल्याने हातातोंडाला आलेली पिके वाळून चालली आहेत. गावाला फेब्रुवारी पासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवू लागला होता.
रेवणगावसाठी राज्य शासनाची जलजीवन मिशनची योजना होती पण ती अपूर्ण आहे. त्यामुळे फेब्रुवारीमधेच शासनाकडे टँकरची कशी मागणी करायची असा प्रश्न निर्माण झाला होता. गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना सरपंच यांना ते सहन झाले नाही. गावचे सरपंच सचिन मुळीक आपल्या चार एकर शेतातील पिकांना बोअरवेलचे पाणी शेततळ्यात टाकून देत होते. गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय हे पाहून शेवटी सरपंचाने मार्च पासूनच शेतीला पाणी न देता आता गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेततळ्यापासून ते गावच्या पाण्याच्या टाकी पर्यत सरपंचाने लाखभर खर्च करून पाइपलाइन देखील केली. आज दिवसाला ७० हजार लिटर पाणी ते स्वतःची जमीन पडीक ठेऊन देत आहेत.
रेवणगावाशेजारी असणाऱ्या तलावात देखील पाणी नाही. शेतातील पीक पावसाअभावी जळून जातेय. यातच पिण्याच्या पाण्यासाठी जर वणवण करावी लागली असती. पण सरपंच मोठ्या मनाने आज गावची सहा महिन्यापासून तहान भागवतोय, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळं गावकऱ्यांचा खऱ्या अर्थाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सरपंचाने स्वतःची शेती पडीक ठेवून सोडवल्याने गावकरी आमचा सरपंच हा खऱ्या अर्थाने गावची काळजी घेणारा सरपंच असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत. जर टँकर सुरू झला असता तर पाणी जास्त करून महिलांनाच आणावे लागते. त्यामुळे सरपंचानी पाणी दिल्यामुळे आमचा कोसो दूर जाऊन कंबर, डोक्यावररुन पाणी आणण्याचा त्रास कमी झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली आहे.