‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदानींना का वाचवत आहेत? त्यांची जेपीसीच्या माध्यमातून चौकशी करून जे दोषी आहेत त्यांना तुरुंगात का टाकलं जात नाही?’ असा सवालही या पत्रकार परिषदेतून राहुल गांधींनी केला आहे. अदानींकडून पैशांची जी अफरातफर करण्यात आली आहे, त्यामध्ये त्यांना एका चीनमधील व्यक्तीनेही मदत केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. तसंच गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचा संबंध जोडताना राहुल गांधी यांनी काही इंग्रजी दैनिकांतील वृत्तांचाही दाखल दिला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गौतम अदानींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केल्याने आगामी काळात भाजपकडूनही आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. राहुल यांच्या या आरोपांना भाजपकडून कसे प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत काय होणार?
विरोधकांच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक बिहारमध्ये पार पडली होती. बिहारमध्ये जदयू आणि राजदचं संयुक्त सरकार आहे. त्यानंतर दुसरी बैठक काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात पार पडली. आता तिसरी बैठक मुंबईत म्हणजेच महाराष्ट्रात होत आहे. विरोधकांची ही पहिली बैठक असणार आहे जिथं इंडिया आघाडीतील कोणताही पक्ष सत्तेत नाही. दुसऱ्या बैठकीत आघाडीला नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडियन नॅशनल डेव्हलमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स असं नाव सर्वांच्या संमतीनं देण्यात आलं. दुसऱ्या बैठकीत आघाडीला नाव मिळाल्यानंतर तिसऱ्या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो जाहीर करण्यात येणार आहे. या लोगोचं अनावरण आज किंवा उद्या करण्यात येणार आहे.