अनिकेत विनायक वानखडे (२३) रा. गौरखेडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पुतण्याचे नाव आहे. खल्लार येथील रहिवासी पंडित प्रल्हादराव वानखडे (५१) यांचे गावाच्या फाट्यावर माऊली स्वीट मार्ट नावाचे हॉटेल आहे. ते कुटुंबासह हॉटेलच्या वरच्या मजल्यावर राहतात. मध्यरात्री त्यांच्यासह कुटुंबातील सदस्य झोपले होते. त्यावेळी त्यांच्या घरात पेट्रोल टाकून जिवे मारण्याचे उद्देशाने आग लावण्यात आली होती. या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे ५ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच त्यांचा मुलगासुद्धा जखमी झाला होता. या प्रकरणी पंडित वानखडे यांच्या तक्रारीवरून खल्लार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासात सदर गुन्ह्यात पंडित वानखडे यांचा पुतण्या अनिकेत याचा हाथ असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांवर काकाने जादूटोणा केला होता. त्यामुळे वडिलांची तब्येत खराब राहत होती. याचा राग आपल्या मनात होता. या रागातून आपण काकाच्या घरात पेट्रोल टाकून आग लावली. त्यांना जिवाने मारण्याचा प्रयत्न केला, असे त्याने चौकशीत सांगितले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे व खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, सुधीर बावणे, नीलेश डांगोरे, अमोल केंद्रे, विशाल हरणे, परेश श्रीराव, अनुप देशमुख, गोपाल सोळंके, विजय निमखंडे यांनी केली.