• Sat. Sep 21st, 2024

पावसाने महाराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळवले; यंदा पाणीसाठ्यात मोठी घट, या जिल्ह्यात परिस्थिती बिकट

पावसाने महाराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळवले; यंदा पाणीसाठ्यात मोठी घट, या जिल्ह्यात परिस्थिती बिकट

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऑगस्टअखेर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा असताना पावसाने राज्यात पाठ फिरविली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये मंगळवारपर्यंत ६४.७० टक्के पाणीसाठा असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे १९.१९ टक्क्यांची तूट आहे. ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा केवळ २० जिल्ह्यांमधील धरणांमध्ये असल्याने राज्यातील पाण्याची स्थिती खराब असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. राज्यात पुणे विभागात सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या तीन विभागातील १३ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ५९ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठी असल्याने स्थिती अत्यंत बिकट आहे.

सोलापूरची स्थिती बिकट

पुणे विभागात ७६.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, गेल्या वर्षी ९५ टक्क्यांपर्यंत धरणे भरली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.५४ टक्क्यांची पाणीसाठ्यात तूट आढळली आहे. पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात आतापर्यंत १४.६५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हे धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्याची स्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे.

जायकवाडीतही कमी साठा

छत्रपती संभाजीनगर विभागात जायकवडी धरणात ३३.२४ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी तो ९८ टक्क्यांपर्यंत होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत या विभागात पावसाने पाठ फिरविल्याने परिस्थिती खराब आहे. माजलगाव, मांजरा या धरणांध्ये १३ ते २३ टक्के पाणीसाठा, तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणात ४५ टक्के पाणीसाठा आहे. नांदेड, लातूर जिल्ह्यातील बहुतांश धरणांत गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

पेरणी केली मात्र पावसाने हुलकावणी दिली, शेतकरी चिंतेत


नाशिकमध्ये काय स्थिती?

नाशिक विभागात गिरणा धरणात ३७ टक्के, तर करंजावण धरणात ६४ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागात ६९ टक्के पाणीसाठा असून, त्यातील काही जिल्ह्यंमध्ये बुलढाणा, वाशीम जिल्ह्याची स्थिती बिकट आहे. नागपूर विभागातील गोसी खुर्द धरणामध्ये ५४.४२ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची तूट दिसून आले आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमधील धरणाची स्थिती चांगली आहे. कोकणात यंदा चांगला पाऊस झाल्याने तेथील जिल्ह्यांमधील धरणांत पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे. त्यामुळे कोकणातील सर्व जिल्ह्यांतील धरणांचा साठा ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असे अहवालात स्पष्ट केले आहे.

साठ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेले जिल्हे

बुलढाणा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर

साठ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असलेले जिल्हे

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा

Mumbai News: पुढील आठवड्यात सर्व खड्डे बुजवा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed