मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावातील मच्छिंद्र गायकवाड हा तरुण दारूच्या नशेत दि. २९ रोजी दुपारच्या सुमारास पाळधी सोनवद रेल्वे गेट याठिकाणी पोहोचला. रेल्वे गेटमन दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी आला होता. दारूच्या नशेत असल्याने याठिकाणी असलेल्या गेटमनला शंका आली. हा तरुण आत्महत्या करण्यासाठी आला असावा, म्हणून गेटमनने तरुणाला हाकलले. पण हा तरुण जायचे नाव घेत नव्हता.
दरम्यान त्याचवेळी एक सुपरफास्ट रेल्वे गाडी या ठिकाणाहून गेली. त्यामुळे सुदैवाने गेटमनच्या समय सुचकतेमुळे त्याचे प्राण वाचले. हा तरुण काही वेळाने तिथून निघून गेला. त्यानंतर पुन्हा मालगाडी येत असल्याचे पाहून रेल्वे गेटजवळ तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध झोपून राहिला. यावेळी गेटमनने त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो उठला नाही. मालगाडी वेगात असल्याने त्या तरुणाच्या अंगावरून तीन मालगाडीचे डबे गेले. त्यानंतर गाडी थांबवून पुन्हा या तरुणाला बघितले असता सुदैवाने तरुण जिवंत होता. विशेष म्हणजे त्याला कुठलीही दुखापत झालेली नव्हती. त्यानंतर तरुणाला तिथून उचलून बाजूला नेण्यात आले.
रेल्वे गेटमनने तरुणाला हटकले नसते तर हा तरुण दारूच्या नशेत पुन्हा रेल्वेखाली आला असता. त्यात त्याचा जीव गेला असता. गेटमन सुनील आर इसे यांनी दाखवलेल्या समय सुचकतेचे तसेच सतर्कतेचे परिसरात कौतुक होत आहे. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी सुद्धा झाली होती. नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलेच झापले आहे. मात्र तरुणाने जमिनीवर झोपून पुन्हा गोंधळ घातला. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून घटनेची मोठी चर्चा रंगली आहे. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या रेल्वे गेटमन यांनी अंगावर काटा उभी करणारी ही संपूर्ण घटना कथन केली.