आगामी लोकसभेच्या अनुषंगाने सर्वच पक्ष तयारीला लागले असून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे. हातकणंगले मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटासोबत महायुतीमध्ये सामील झाल्याने महाविकास आघाडीकडे महायुतीचा सामना करेल असा उमेदवार नसल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या बंडामुळे महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आहे. तर प्रागतिक विचार मंचच्या खाली लहान-मोठे पक्ष एकत्र येत तिसरी आघाडी तयार केली असून या आघाडीतील प्रमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यायची चर्चा सुरू आहे.
मात्र राजू शेट्टींनी एमएसपीच्या मुद्यावरून महाविकास आघाडीची कोंडी केली आहे. एमएसपी कायद्याबाबत शब्द देईल त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे. यामुळे हातकणंगले मतदारसंघ कोण लढवणार? असा प्रश्नचिन्ह महाविकास आघाडी समोर निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पर्याय म्हणून जयंत पाटील यांचा मुलगा किंवा भाच्याला उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून ते शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. तसेच जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील दोन तालुके हे हातकणंगले मतदारसंघात येत असल्याने त्याचा फायदा जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील यांना होऊ शकतो. कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या शरद पवारांच्या सभेत प्रतिक पाटील यांनी उपस्थिती लावली होती. शरद पवार यांनी देखील यापुढे युवकांना संधी देण्यात येईल, असे म्हटल्याने राजू शेट्टी यांनी जर महाविकास आघाडीची ऑफर फेटाळली तर प्रतिक पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे प्रतिक पाटील यांनी देखील निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू केली असून पक्षाने आदेश दिल्यास आपण लढण्यास तयार असल्यासही प्रतिक पाटील यांनी म्हटले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले जागा ही शिवसेनेकडे गेली होती. मात्र, महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर जागा वाटपाचे समीकरण बदलत आहे. अशातच विद्यमान खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटासोबत गेल्याने कोणत्याही परिस्थितीत या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार पुन्हा निवडून आणू, असे ठाकरे गटाकडून म्हणण्यात येत आहे. तर शरद पवार यांनी देखील ज्याची जिंकण्याची शक्यता जास्त तोच तेथे लढेल अशी भूमिका असल्याने शिवसेना ठाकरे गट हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देईल का ? महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या तिढा निर्माण वाढेल हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.