करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातील प्रथमेश सावंत, विलेपार्ले येथील शिवशंभो गोविंदा पथकातील संदेश दळवी आणि भांडुप येथील साई स्पोर्ट्स क्लब गोविंदा पथकातील प्रथमेश परब या तिघांचा दहीहंडीच्या थरांवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
‘प्रत्येक मंडळाने गोविंदाच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. तशा उपाययोजना केल्याशिवाय उत्सव साजरा करू नये. तसेच अतिशय लहान मुलांना या दहीहंडीच्या थरावर चढवू नये,’ असा सल्ला प्रथमेश सावंत या गोविंदाचे चुलते संतोष सावंत यांनी दिला.
विलेपार्ले येथे दहीहंडी फोडताना पडून मृत्यू पावलेल्या संदेश दळवी याच्या मोठ्या भावाने हे जीवघेणे उत्सव साजरे केले जाऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘या दुर्घटना घडल्यानंतर कुटुंबाला फार त्रास सहन करावा लागतो. ही कधीही न भरून येणारी हानी असते. मंडळे किंवा संस्था तात्पुरती मदत करतात. मात्र दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन संदेश दळवी या गोविंदाचा भाऊ योगश दळवी यांनी केले.
दुर्घटनेनंतर यंदा मंडळाकडून दहीहंडी नाही
गेल्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेत विलेपार्ले येथील शिवशंभो गोविंदा पथकातील संदेश दळवी याचा मृत्यू झाला. त्यानंतर या गोविंदा पथकाने यंदा दहीहंडीत गोविंदा पथक उतरवायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. ”गेल्या वर्षी दुःखद घटना घडून संदेश याचा मृत्यू झाला. त्यामुळे यंदा दहीहंडीत गोविंदा पथक उतरवणार नाही. मंडळातील देवाची पूजा करून तेथे केवळ छोटी दहीहंडी फोडू व सण साजरा करू,” अशी माहिती शिवशंबो गोविंदा पथकाचे अध्यक्ष यांनी दिली.