एक बांग्लादेशी दाम्पत्य एअर विस्ताराच्या फ्लाइट क्रमांक यूके ८१४ या विमानाने बंगळूरू ते नवी दिल्ली प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या लेकीची प्रकृती बिघडली. सुदैवाने विमानात वैद्यकीय पार्श्वभूमी असलेले प्रवासी होते. त्यांनी संवेदनशीलतेचा परिचय देत चिमुकलीला प्राथमिक उपचार दिले. मात्र, प्रकृतीत फारशी सुधारणा दिसून आली नाही. दरम्यान, एअर विस्ताराने नागपूर विमानतळाच्या प्रशासनाशी संपर्क साधत आकस्मिक लँडिंगची परवानगी मागितली. त्यानुसार रविवारी रात्री १०.३० वाजतादरम्यान नागपूर विमानतळावर विमानाचे आकस्मिक लॅण्डिंग झाले.
विमानतळावर तैनात असलेल्या किम्स-किंग्ज्वे हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेद्वारे तिला रुग्णालयात आणण्यात आले. तिला तातडीने दाखल करून घेण्यात आले असून सध्या तिच्यावर बालरोगतज्ज्ञ डॉ. कुलदीप सुखदेवे यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती किम्स-किंग्ज्वे हॉस्पिटलचे उपमहाव्यवस्थापक (ब्रॅण्डिंग अॅण्ड कम्युनिकेशन) एजाज शमी यांनी दिली.
वैद्यकीय उपचार घेऊन जात होते परत
प्राप्त माहितीनुसार, प्रकृती बिघडलेल्या बांग्लादेशी बालिकेला जन्मत: हृदयाशी निगडीत आजार आहे. त्यावरील उपचारासाठी तिचे आई-वडील बांग्लादेशहून बंगळुरू येथील नारायणा इन्स्टिट्युट ऑफ कार्डिआक सायन्सेस येथे आले होते. तिथे बालिकेवर शस्त्रक्रिया झाली. उपचार पूर्ण करून ते नवी दिल्लीला निघाले होते. ते तेथून पुढे बांग्लादेशला परत जाणार होते. मात्र, बंगळुरू ते नवी दिल्ली प्रवासादरम्यान बालिकेची प्रकृती बिघडल्याने पालकांची चिंता वाढली आहे.