पुणे-दौंड दरम्यानच्या एकूण ७६ किलोमीटर अंतरात ट्रेनने धावण्याचा ५ मिनिटांचा वेळ वाचवला. उद्या (मंगळवार) आणखी २ गाड्या क्र. २२९४४ इंदूर-दौंड एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. ११३०१ मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस ताशी १३० किमी वेगाने धावण्याची योजना आखण्यात आली आहे. येत्या काळात एलएचबी कोच असलेल्या सर्व २२ गाड्या या मार्गावरून हळूहळू ताशी १३०किलोमीटर वेगाने धावणार आहेत. तसेच, वंदे भारत एक्सप्रेसला देखील याचा फायदा होणार आहे. यापूर्वी या विभागात सर्व गाड्या ताशी ११० किमी वेगाने धावत होत्या.
हा विभाग ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी ट्रॅक तयार करणे, ओएचई नियमन आणि सिग्नलिंगची कामे यासारखी तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता सर्व रोलिंग स्टॉक आणि इंजिन १३० किमी प्रतितास वेगाने या विभागात जास्तीत जास्त १३० किमी ताशी या वेगाने धावतील आणि धावण्याचा वेळ वाचेल. सर्व आवश्यक सुरक्षेच्या बाबींवर योग्य लक्ष देऊन या विभागाचा वेग वाढवला आहे.
तत्पूर्वी मुख्य सुरक्षा आयुक्त/मध्य विभाग मनोज अरोरा, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी, पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या पथकाने या विभागाची तांत्रिक पाहणी केली आणि सुधारणा सुचवल्या. पुणे विभागाने अडथळे दूर केले आणि आज कमाल मान्य वेग मर्यादा १३० किमी प्रतितास वेगाने पहिली ट्रेन धावली. यामुळे प्रवासी गाड्यांची धावण्याची वेळ कमी होईल आणि गाड्यांची एकूण वक्तशीरता सुधारेल.