याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रवींद्र गावित हा जनावरांना घेऊन वडबारी शिवारातील शेतात गेला होता. यावेळी बाजूच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. रवींद्रने आरडाओरड करत सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. मदतीसाठी आजूबाजूला कोणीही नसल्याने बिबट्याने त्यांच्या शरीराचे लचके तोडत दूरवर ओढत नेले. शेतात कोणीही नसल्याने ही बाब लवकर लक्षात आली नाही. रवींद्र दुपारी जेवण करण्यासाठी घरी आला नाही म्हणून घरातील मंडळींनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी शेतालगतच एका कोपऱ्यात रवींद्रचा मृतदेह छिन्नविछिन्न अस्वस्थेत आढळून आला.
याबाबत दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती देऊन वन अधिकारी, कर्मचारी व पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह पेठ ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. परिसरात बिबट्याची मादी, दोन बछडे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या घटनेनंतर याठिकाणी तत्काळ वनविभागाने पिंजरा लावून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली आहे. भक्ष्य व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येणाऱ्या बिबट्यांनी आता थेट आक्रमक हल्ले सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आधी देखील अशा पद्धतीच्या अनेक घटना नाशिक जिल्ह्यात घडल्या आहेत. नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर हा कायमच असल्याचे दिसून येते.