‘तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत १ लाख ६८ हजारांचं मताधिक्य दिलं. समोरच्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त केलं. असं केल्यानंतर मी काय करायचं? त्यामुळे मी पहाटे ५ वाजताच बावचळून उठतोय. कामाला लागतोय. बायको म्हणते दमानं, दमानं घ्या. हे चाललंय काय? जरा वयाचा विचार करा. पण वय वगैरे काही नसतं. कामामधून वेगळंच समाधान मिळतं. बारामतीकर उद्या साखर झोपेत असताना सकाळी पावणे सहाला मी पाहणी करण्यासाठी कुठल्यातरी साइटवर असेल. यामुळे बारामतीकरांना त्रास होत नाही. सकाळी १० वाजता मी निघालो तर तुम्ही इतकी गर्दी करता की मला ते पाहताच येत नाही. त्यामुळे तुम्ही झोपेत असताना कामाची पाहणी करायची म्हणजे सूचना देता येतात,’ असं अजित पवार यांनी म्हटलं.
सत्तेत सामील होण्यामागील भूमिका केली स्पष्ट
‘मी केवळ विकासाचा दृष्टीकोन ठेऊन सत्तेत सामील झालो आहे. मी जी काही भूमिका घेतली आहे, ती अवघ्या महाराष्ट्राला सांगावी लागेल, त्यामुळे मला विविध ठिकाणी सभा घ्याव्या लागत आहेत. उद्या बीड, परभणी या ठिकाणी माझी सभा आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार मी पुढे घेऊन जात आहे, ते कृतीतून दिसलं पाहिजे. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था टॉप पाचमध्ये आणण्याचं काम केलं आहे. आतापर्यंत जेवढे पण पंतप्रधान होऊन गेले त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम काम केलं. देश जगात नंबर वन होईल यासाठी अतोनात प्रयत्न केले. मी याआधी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सभा घेतल्या हे मी मान्य करतो. पण आज संपूर्ण देशात चांगलं काम सुरू आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या ताकदीचा दुसरा नेता मला दिसत नाही,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी सत्तेत सामील होण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली.