आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे कुठे कमी पाऊस, तर कठे अतिरिक्त पाऊस, यामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे आणि हे नुकसान आणखी दरवाढीला कारणीभूत ठरू शकते, अशीही शंका घेतली जात आहे. मुळातच नवीन आर्थिक वर्षाला विचित्र हवामान व वातावरणाने सुरुवात झाली. चक्क एप्रिल महिन्यापर्यंत पाऊस कोसळत होता आणि जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर बहुतांश राज्यांमध्ये पाऊसच नव्हता. त्यानंतर जुलैमध्ये अनेक राज्यांमध्ये खूप जास्त अतिरिक्त पाऊस झाला. तर, कितीतरी राज्यांना महापुराच्या समस्येला सामोरे जावे लागले. अशी एकीकडे परिस्थिती असताना, मराठवाड्यातील निम्म्या जिल्ह्यांसह इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही बराच कमी पाऊस आहे. या सगळ्या हवामानाचा तसेच वातावरणाचा आणि कुठे अत्यल्प, तर कुठे अतिरिक्त पावसाचा फटका पिकांना बसला. त्याचाच परिणाम म्हणून आधी गव्हाला फटका बसून गहू महागला आणि पाठोपाठ इतरही धान्य महागले. त्यानंतर डाळींच्या उत्पादनावरही याच स्थितीमुळे प्रतिकुल परिणाम झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रतिकुल परिणाम यापुढे कमी होणार आहे की वाढणार, याविषयीसुद्धा विविध तर्क मांडले जात आहेत.
तूर डाळीने केला कहर
सद्यस्थितीत तूर डाळीचे सर्वाधिक भाव आहेत. एक ते दीड महिन्यापूर्वी १३० ते १३५ रुपये किलोने ठोक विक्री झालेल्या तूर डाळीची आता १५० रुपये किलोने विक्री होत आहे. साहजिकच किरकोळ बाजारात तूर डाळीचे भाव १५० रुपयांपुढेच आहेत. हरभरा डाळीचे ठोक भाव ६० रुपये किलो होते, तर आता ७० रुपये किलो झाले आहेत. किरकोळ भाव ७५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मूग डाळीचे ठोकचे भाव ९५ रुपयांवरुन १०५ रुपयांपर्यंत आणि किरकोळ भाव १२० रुपये किलोपर्यंत, तर उडीद डाळीचे ठोकचे भाव ९० रुपयांवरुन १३० रुपयांपर्यंत आणि किरकोळ भाव १३० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
वर्षात किमान ५० रुपये वाढ
मागच्या वर्षभरात डाळींमध्ये किमान ५० रुपयांनी भाववाढ झाली आहे. याच काळात मागच्या वर्षी तूर डाळ १०० ते ११० रुपये किलोपर्यंत होती. तसेच इतरही डाळींमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत सर्वसाधारणपणे ३० ते ५० रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
पोह्यातही दरवाढ कायम
सर्वसामान्यांच्या पोह्यांमध्येही चांगलीच दरवाढ झाली आहे. अलीकडे पोह्यांचे किरकोळ भाव ६० रुपये किलोवरुन ६५ रुपयांवर पोहोचले आहेत आणि काही आठवड्यांपासून पोह्यात हळूहळू दरवाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
अनेक राज्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये खूप जास्त, तर अनेक जिल्ह्यांमध्ये खूप कमी पाऊस झाला आहे. यामुळे डाळींच्या उत्पन्नावर बराच प्रतिकुल परिणाम झाला आहे आणि यापुढील काळात आणखी दर वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. -नीलेश सेठी, अध्यक्ष, किराणा मर्चंटस् असोसिएशन
सुरुवातीला अवकाळी आणि नंतर अतिरिक्त पाऊस झाला आणि त्यामुळे डाळींच्या उत्पादनाला अपेक्षेपेक्षा जास्त उशीर झालाच; शिवाय मालाचे लक्षणीय नुकसानही झाले. सद्यस्थितीत डाळीचे भाव दीडशे रुपयांपर्यंत वाढले असले, तरी आणखी भाववाढ होण्याची शक्यता वाटत नाही. गरज पडली तर डाळींच्या आयातीतून भाववाढीवर मार्ग काढला जाऊ शकतो.- संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
डाळी महागल्या आणि इतर धान्यातदेखील कमी-अधिक प्रमाणात भाववाढ झाली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या सामान्यांना महिन्याचे बजेट सांभाळता-सांभाळता नाकेनऊ येत आहे. आता ऐन सणासुदीच्या काळात ही भाववाढ आनंदावर विरजण टाकणार आहे की काय, अशीही शंका येत आहे.-गीता मुंडे, गृहिणी
डाळींमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात आणि प्रथिनांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास व टिकून राहण्यास मोठीच मदत होते. त्यामुळेच भाज्या मिसळून आपल्याकडे डाळींचे सेवन केले जाते. मात्र डाळी १६०-१७० रुपयांपर्यंत महागल्या, शिवाय भाज्याही महागल्या. त्याचा परिणाम म्हणून गोरगरीब व सामान्यांच्या आहारात डाळींचे प्रमाण घटणार आणि त्याची किंमत अनारोग्याला आमंत्रण देऊन सामान्यांना मोजावी लागणार, असे सध्या चित्र आहे.-अलका कर्णिक, गृहिणी व आहारतज्ज्ञ
साधारण किरकोळ भाव असे
वस्तू……………भाव (किलोमध्ये)
तूर डाळ……..१५० रुपये
मूग डाळ……..१२० रुपये
हरभरा डाळ……०७५ रुपये
उडीद डाळ………१३० रुपये
मसूर डाळ………१०० रुपये
गहू………………३२ ते ५५ रुपये
ज्वारी………….४५ ते ६० रुपये
बाजरी……………३५ ते ४० रुपये
तांदूळ……………..५० ते ६५ रुपये
बासमती…………..१०० ते १२० रुपये
मूग…………………..१२० रुपये
मटकी……………….१५० रुपये