माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने सापाच्या आणखी एका नव्या प्रजातीचा शोध आंबोली परिसरात लावला. सापाची ही नवी प्रजात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आढळून आली आहे. सह्याद्रीओफिस असं या सापाच्या नव्या प्रजातीला नाव देण्यात आलं आहे. याआधीही तेजस ठाकरे यांनी ११ हून अधिक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावून त्यांना ओळख मिळून दिली आहे.
दरम्यान २०१४ मध्ये तेजस ठाकरेंनी पालीची एक नवी जात शोधली. तेजस ठाकरे यांचा पालीवरील शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिक असलेल्या ‘झुटाक्सा’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटामध्ये सापाची एक नवी प्रजात देखील शोधली आहे. सापासोबतच त्यांनी गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या एका प्रजातीचाही शोध लावला आहे. वन्यजीव संवर्धनासाठी त्यांचं काम सातत्यानं चालू आहे.
आंबोली परिसरात आढळणारे वेगवेगळ्या प्रजातीचे साप, बेडूक, मासे, फुलपाखरू व इतर कीटक व वनस्पती हे वाइल्ड लाईफ आहे. त्यामुळे छायाचित्रकारांसाठी व निसर्ग अभ्यासकांसाठी व संशोधकांसाठी एक नवीन डेस्टिनेशन बनत चालले आहे.
आंबोलीत काही युवकांना वन विभागाच्या सहायाने प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या युवकांच्या उपस्थितीत रितसर नोंदणी करून निर्धारित वेळेसाठी निसर्ग पर्यटनासाठी परवानगी देण्यात आली आहे.
निसर्ग पर्यटन करताना वन विभागाने दिलेल्या सर्व अटी व शर्तींचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करायचे आहे व मिळालेल्या संधीचे सोने करावे, अशी अपेक्षा आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली.