राष्ट्रवादीतील बंडानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार हेच आमचे नेते असल्याचं सांगितलं जात होतं. तसंच सर्व पोस्टर्सवर शरद पवारांचा फोटोही लावण्यात येत होता. मात्र स्वत:चं नाणं खणखणीत नसल्यामुळेच हे लोक माझ्या फोटोचा वापर करत असल्याचं सांगत शरद पवार यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. पवार यांच्या या इशाऱ्यानंतर आता अजित पवार गटाने सावध भूमिका घेत आपल्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो वापरणं टाळल्याचं दिसत आहे.
क्षीरसागर कुटुंबात चाललंय काय?
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आज प्रवेश केला. योगेश हे माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. क्षीरसागर घराण्यातील आमदार संदीप क्षीरसागर शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात बीडमध्ये शरद पवार यांची स्वाभिमान सभा आयोजित केली होती. त्यामुळे त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, जयदत्त क्षीरसागरांनी अद्याप ‘वेट अँड वॉच’चे धोरण अवलंबल्याचे दिसते. जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत असणारे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी मात्र वेगळा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यांनी आधी अजित पवार यांची भेट घेतली आणि आज त्यांच्या पक्षात प्रवेशही केला.
दरम्यान, आज मुंबईमध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही. सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही, अशा शब्दांत जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.