स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, माकप, सुराज्य, समाजवादी, बहुजन विकास आघाडी, माकप, भाकप यासह विविध १३ पक्षांनी एकत्र येत राज्यात प्रागतिक विचार मंच या नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे. यातील बहुसंख्य पक्ष ‘इंडिया’ आघाडीत सहभागी झाले आहेत. पूर्ण प्रागतिक मंचच त्यामध्ये सहभागी होणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे. शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकाराने तशी महाविकास आघाडीबरोबरच चर्चा सुरू आहे. पहिला टप्पा म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे.
प्रागतिक विचार मंचला लोकसभेला आणि विधानसभेला काही जागा देण्यात येणार आहेत. सध्या लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. निवडून येण्याची शक्यता असलेल्या पक्षाला उमेदवारी हा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामध्ये विचार मंचला काही जागा देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तशी ऑफर दिली आहे. पटोले यांनी थेट शेट्टी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी हातकणंगलेची जागा देण्याबाबतचा शब्द दिला आहे. याशिवाय आणखी एक जागा देण्यात येणार आहे. भाजपला टक्कर देण्यासारखा उमेदवार सध्या या आघाडीकडे नाही. पण, शेट्टींना ताकद दिल्यास आघाडीचे ध्येय साध्य होणार आहे. जागा वाटपात ही जागा काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट अथवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली तरी हे सर्वच शेट्टी यांनाच ती जागा देण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनेच सध्या हालचाली सुरू आहेत.
महाविकास आघाडी हातकणंगलेची जागा प्रागतिक विचार मंचला देणार आहे. त्यामुळे शेट्टी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शेट्टी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर हातकणंगलेची जागा स्वाभिमानी संघटनेला मिळणार हे निश्चित आहे. येत्या ४ सप्टेंबरला कोल्हापुरात विचार मंचची बैठक होणार आहे. यावेळी हा मंच महाविकास आघाडी व इंडिया मध्ये सहभागी होण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
‘भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीसोबत आम्ही शंभर टक्के जाणार नाही. स्वतंत्र किंवा महाविकास आघाडी हे दोन पर्याय आमच्यासोबत आहेत. प्रागतिक विचार मंच महाविकास आघाडी सोबत जाणार आहे. आघाडीने आपल्यालाही ऑफर दिली असून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल,’ असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महायुतीचे संभाव्य उमेदवार म्ह्णून खासदार धैर्यशील माने यांचे नाव निश्चित आहे. पण त्यांना पर्याय शोधण्याचा प्रयत्नही भाजपमधून सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शेट्टी यांचे नाव निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. तसे झाल्यास आघाडीला मोठे बळ मिळणार असून भाजपसमोर कडवे आव्हान उभे राहणार आहे. अशावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राहुल आवाडे, सुरेशदादा पाटील या नावांबाबत सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे.