• Sat. Sep 21st, 2024

उच्चशिक्षित घरातील तरुण गायब झाला, रस्तोरस्ती फिरू लागला, पण सोशल मीडियाने जादू केली आणि…

उच्चशिक्षित घरातील तरुण गायब झाला, रस्तोरस्ती फिरू लागला, पण सोशल मीडियाने जादू केली आणि…

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सोशल मीडियाचे दुष्परिणाम सांगण्यात येत असतानाच त्याचे चांगले परिणामदेखील समाजात दिसून येतात. अशीच घटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) घडली. सोशल मीडियामुळे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथून बेपत्ता झालेला फय्याज शेख या मनोरुग्ण युवकाची दोन वर्षांनंतर त्याच्या कुटुंबीयांशी भेट झाली. मेडिकलमधील समाजसेवा विभागाच्या प्रयत्नांमुळे हा योग जुळून आला असून या निमित्ताने समाजातील संवेदनशीलचा प्रत्यय नागरिकांना आला.

अहमदपूर ते नागपूर असे अंतर कापणाऱ्या फय्याजची कहाणी अक्षरश: अंगावर काटा आणणारी आहे. पायाला झालेल्या जखमेमुळे तो प्रचंड विव्हळत होता. रांगत रांगत चालण्याचा केविलवाणा प्रयत्न, मळलेले कपडे आणि वाढलेले केस, पादचारीसुद्धा त्याला बघून आपला रस्ता बदलून पुढे जाऊ लागले. कोणत्याही मनुष्यावर इतकी भयानक वेळ येऊ नये, अशा अवस्थेत तो मेडिकल रुग्णालयाच्या प्रांगणात बाह्यरुग्ण परिसरात पडला होता. पायामध्ये झालेली जखम इतकी खराब होती की अक्षरशः त्यात किडे तयार झाले होते. अशा अवस्थेत त्याला मेडिकल हॉस्पिटलमधील सर्जरी आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर वॉर्डमध्ये सर्जरी विभागांतर्गत दाखल करण्यात आले. उपचार सुरू झाल्यानंतर जखम बरी होत गेली. प्रकृतीत सुधारणा होत गेली. डॉ. गिरीश उमरे आणि सर्जरी विभागातील इतर डॉक्टर, परिचारिकांच्या प्रयत्नांमुळे तो ठणठणीत बरा झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार; महाराष्ट्राचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांचं जपानमध्ये स्वागत

मात्र, हा रुग्ण कोण आहे, तो कुठून आला, याची काहीही माहिती कुणासही नव्हती. समोर आलेल्या रुग्णाला बरे करण्याचा वैद्यकीय धर्म डॉक्टरांनी निभावला होता. मात्र, त्या रुग्णाची ओळख पटवून त्याची त्याच्या कुटुंबीयांशी भेट घडवून देणे आवश्यक होते. त्यादृष्टीने मेडिकलमधील डॉक्टरांचे प्रयत्न सुरू झाले. अनोळखी रुग्ण असल्याने समाजसेवा विभागास कळविण्यात आले. समाजसेवा अधीक्षक सचिन दोड यांनी त्याचे नाव, पत्ता आणि कुटुंब याची माहिती विचारली असता फय्याज शेख, रा. अहमदपूर, जिल्हा लातूर अशी माहिती त्याने दिली. केवळ इतक्याच माहितीच्या आधारावर त्याच्या कुटुंबाचा शोध सुरू झाला.

रुग्णाचा फोटो आणि दिलेल्या माहिती संदर्भातील पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली. ही पोस्ट लातूर जिल्ह्यात व्हायरल होताच समाजसेवा अधीक्षक यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन सुरू झाले आणि फय्याजच्या कुटुंबीयांचा शोध अखेर पूर्ण झाला. त्यानुसार त्याला २१ ऑगस्ट रोजी त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. यानिमित्ताने नियतीच्या लाटेवर भरकटत असताना अपघाताने आयुष्याला सकारात्मक वळण मिळून अशा अनेक रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घालून देण्याचे काम मेडिकलमधील समाजसेवा विभाग सातत्याने करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

उच्चशिक्षित कुटुंबातील पण अंशत: मनोरुग्ण

फय्याज हा उच्चशिक्षित कुटुंबातील सदस्य असून अंशतः मनोरुग्ण आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून भटकत होता. तो हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. तसेच सापडल्यास २५ हजाराचे बक्षीससुद्धा जाहीर करण्यात आले होते. फय्याजचे वडील डॉक्टर होते. त्याचा चुलत भाऊ डॉक्टर असून एक भाऊ दुबईला वैमानिक असल्याची माहिती फय्याजचे काका डॉ. मिर्झा बेग यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed