सद्या राज्यभरात तलाठी सह विविध शासकीय पदासाठी परीक्षा घेतली जातं आहे. अनेक परीक्षार्थी इतर जिल्ह्यात जाऊन परीक्षा देत आहेत. नांदेडचे शेकडो विद्यार्थी तलाठी सह विविध पदाच्या परीक्षेसाठी नागपूरचे परीक्षा केंद्र निवडले होते. रविवारी त्यांची परीक्षा होती. सकाळी ७ वाजता या विद्यार्थ्यांना परीक्षा सेंटरवर हजर राहावं लागणार होतं. त्यामुळे शनिवारी रात्री सात वाजता शेकडो परीक्षार्थी नांदेडच्या बस आगारात पोहचले. एक तास,एक तास म्हणत रात्री ११ वाजले, मात्र बस काही उपलब्ध झाली नाही. दूसरीकडे खासगी ट्रॅव्हल बसही उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे परिक्षार्थी गोंधळात पडले. परीक्षा देता येणार की नाही यावरून परीक्षार्थी चिंतेत होते. सोलापूर – नागपूर बस नांदेड मार्गे येणार होती. मात्र ती बस पण लातूर येथे बंद पडली. त्यामुळे शेकडो परीक्षार्थी बस स्थानकात अडकून पडले. अखेर परीक्षार्थीनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना थेट फोन केला आणि माहिती दिली. त्यानंतर चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना फोन केला आणि ताबडतोड नागपूरला दोन बस उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. एवढचं नाही तर अशोक चव्हाण यांनी आपल्या स्वीय सहायकांना देखील बस स्थानकात पाठवले. चव्हाण यांच्या सुचनेनंतर आगारातील अधिकाऱ्यांनी ११.४० वाजता नांदेडहून नागपूरसाठी दोन बसेस सोडल्या. गाडी उपलब्ध झाल्याने शेकडो परीक्षार्थी वेळेवर परीक्षा सेंटरवर पोहोचून परीक्षा दिली . यावेळी परीक्षार्थींनी अशोक चव्हाण यांचे आभार मानले.
अशोक चव्हाणांवर हायकमांकडून महत्त्वाची जबाबदारी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांना स्थान देण्यात आले होते. काँग्रेसच्या कार्य समितीत मुकुल वासनिक यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आले आहे. यासाठी अशोक चव्हाण यांनी ट्विट करुन पक्षनेतृत्त्वाचे आभार मानले होते. बाळासाहेब थोरात यांना समितीमधून वगळण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील अशोक चव्हाण यांचे वजन वाढल्याची चर्चा आहे.