• Sat. Sep 21st, 2024

Kolhapur News: अखेर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी के.मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती

Kolhapur News: अखेर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी के.मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती

कोल्हापूर: गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त असलेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उद्या बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या पदावरून सुरू असलेल्या राजकारणाला आता पूर्णविराम मिळणार आहे.

अडीच महिन्यांपूर्वी तत्कालीन आयुक्त कादंबरी बळकवडे यांची पुणे येथे बदली झाली होती यानंतर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती. मात्र अडीच महिन्याचा काळ लोटला तरी कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त मिळेना यामुळे कोल्हापूरचा राजकारण चांगलं तापलं होत. आयुक्त भाजपने दिलेला असावा की शिंदे गटाने दिलेला असावा यासाठी ही नियुक्ती रखडली असल्याची चर्चा सुरू होती. यासाठी अनेक संघटनांनी व पक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पासून ते आई अंबाबाईपर्यंत साकडे घातले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील १५ ऑगस्ट रोजी झालेल्या भाषणात पुढील आठवड्याभरात कोल्हापूरला आयुक्त देण्याचा शब्द दिला होता. तर तत्कालीन आयुक्त कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर महानगरपालिका प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावारांकडे देण्यात आला होता. मात्र, त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. शिवाय त्यांच्याकडे असलेल्या जिल्हाधिकारी पद तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तसेच महानगरपालिकेचा प्रभारी प्रशासक म्हणून असलेला पदभार यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता. यामुळे महानगरपालिकेची अनेक कामे रखडली होती. मात्र आता अखेर आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाल्याने कोल्हापूरकरांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. के. मंजुलक्ष्मी हे कोल्हापूरचे नवीन आयुक्त म्हणूनउद्या पदभार स्वीकारणार आहेत.

के. मंजूलक्ष्मी हे सध्या सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून ते सिंधुदुर्ग मध्ये सर्वाधिक प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. ते सिंधुदुर्ग येथे दोन वर्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तीन वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.के.मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या त्यानंतर दोन वर्षानी २० मे २०२० रोजी त्यांची जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली होती. कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट काम केले होते.तर सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला होता यामुळे त्यांचा दिल्लीत सत्कार ही झाला होता.

राष्ट्रवादीच्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारलं, शाहू महाराज छत्रपती भाजपविरोधात रणशिंग फुंकणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed