जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एर्टिगाची चौघांना धडक बसली आहे. कारला दोन नंबर प्लेट्स आणि आत पोलिसांच्या काठ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.
भीषण अपघात आणि चालक फरार
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर महामार्गावरून एक एर्टिगा कार अत्यंत वेगाने विरुद्ध दिशेने (Wrong Side) येत होती. यावेळी रस्त्यावरील चौघांना या कारने भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, संधी साधून कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
एकाच कारला दोन नंबर प्लेट्स
या अपघातातील सर्वात संशयास्पद बाब म्हणजे संबंधित कारला चक्क दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट्स लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. कारवर वरच्या बाजूला MH 12 JM 0101 ही नंबर प्लेट आहे, तर तिच्याच खाली MH 15 EX 9694 या क्रमांकाची दुसरी प्लेट लावलेली दिसून आली. एकाच वाहनावर दोन वेगवेगळे क्रमांक असल्याने ही गाडी नेमकी कोणाची आणि त्यामागे काय गौडबंगाल आहे, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
Ahilyanagar News : गॅस तुटवड्याच्या अफवा, शिर्डी-शनिशिंगणापूरमध्ये पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान; अवैध रिफिलिंगवर वॉच
गाडीत आढळल्या पोलिसांच्या काठ्या
अपघातग्रस्त कारच्या सीटवर पोलिसांच्या काठ्या देखील आढळून आल्या आहेत. दोन नंबर प्लेट्स आणि पोलिसांच्या काठ्या यामुळे या प्रकरणातील संशय अधिकच बळावला आहे. ही गाडी गुन्हेगारी कृत्यासाठी वापरली जात होती की आणखी काही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही नंबर प्लेट्स आणि गाडीतील साहित्य जप्त केले असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
