पिंपरी-चिंचवडमधील चिखली जाधव वाडी येथील हे कैलास सरोवर मंदिर आहे. जिथे १,१११ महादेवाच्या पिंड आहेत. त्याचबरोबर इथे मंदिराच्या मुख्यद्वारावरच भगवान शिव शंकराची मोठी मूर्ती आहे. तर, दुसरीकडे मंदिराच्या समोर नंदीजी आणि पिंडाची मोठी भव्य मूर्ती आहे. श्रावण महिन्यात आणि अन्य दिवशी या मंदिरांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या मंदिराची एक विशेष गोष्ट म्हणजे या मंदिराच्यावर असलेली २५ फुटाची महादेवाची पिंड, कैलास सरोवर मंदिर बनविण्यामागे ईश्वर गुंडे यांची एक वेगळीच कहाणी आहे.
ईश्वर गुंडे उर्फ साइराम यांच्या चिखलीमधील या जागेत त्यांच्या कुटुंबाला एक बंगला बनवायचा होता. मात्र, बंगल्याचे बांधकाम सुरू झाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक किस्से घडले आणि त्यानंतर इथे बंगला न बनता भव्य मंदिर बनविण्यात आले. बांधकाम करताना सापडलेल्या महादेवाच्या पिंडाला ५१ फूट मोठं करत त्यांनी पिंडाची स्थापना केली.
एक पिंड सापडली आणि त्यानंतर साईराम बाबांनी इथे १ हजार एकशे अकरा महादेवाच्या पिंड स्थापित केल्या. त्याचबरोबर त्यांनी या मंदिरात १२ ज्योतिर्लिंग मंदिर आणि गुप्त १२ ज्योतिर्लिंग बनविले. एवढेच नाही तर तीन मजली मंदिराच्यावर त्यांना तीन कळस बनवायचे होते. मात्र त्यांच्या स्वप्नात शिव पार्वती प्रकट झाले आणि पार्वती माता पिंडाच्या आणि शंकर भगवान लिंगाच्या रुपात दिसले. त्यानंतर त्यांनी २५ फुटाची भव्य महादेवाची पिंड मंदिराच्या वर उभारली आहे. जी लांबूनच दिसून येते.
साईराम बाबा यांना नेहमीच असं वाटत की भक्तांचे भलं व्हावे. त्यासाठी त्यांनी एकाच ठिकाणी शिव शंकराच्या १ हजार १११ पिंड, राम दरबार, हनुमान मंदिर , संतोषी माता मंदिर, दर्गा, गणपती मंदिर, विष्णू मंदिर, साई मंदिर अशी अनेक मंदिर बनवली. साईराम बाबा यांना कैलास मान सरोवर मंदिराला शिव शक्तीपीठ बनवायची इच्छा आहे, त्यांचं म्हणणं आहे की इथे महादेवाच्या पिंडांचं दर्शन केल्यावर भक्तांना जिवंत शिव भगवनाच दर्शन केल्याची अनुभूती मिळेल.
ईश्वर गुंडे जर्फ साईराम बाबा हे मूळ हैद्राबादचे रहिवासी असून १९७१ मध्ये जेव्हा देशात दुष्काळ पडला तेव्हा ते नोकरीच्या शोधात आपल्या भावाकडे पुणे शहरात आले. त्यानंतर त्यांनी धोबीचे काम सुरू केले आणि बघता बघता त्यांच्यासोबत चमत्कार होऊ लागले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरातील कैलास मानसरोवर मंदिर येथे श्रावण मासाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी पाहायला मिळते. हे एक अद्भुत मंदिर असून इथे दर्शन केल्यावर मनशांती मिळत असल्याचा अनुभव भक्त सांगतात. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड करांसाठी हे एक मोठी पर्वणीच असल्याचे देखील भक्तांचे म्हणणं आहे.