मागील वर्षभर लम्पी रोगावर नियंत्रण मिळविल्यानंतर सांगली जिल्ह्यात पुन्हा लम्पी रोगाने डोके वर काढले आहे. दोन महिने अपवादात्मक आढळणार्या लम्पीने थैमान घातले असून सध्या १ हजार ९२ जनावरे बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ७२ जनावरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर लम्पीला प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सव्वातीन लाख गायवर्ग जनावरांपैकी १ लाख ७५ हजार जनावरांचे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
गेल्या चार महिन्यांत १ हजार ६२९ जनावरे बाधित आढळून आली आहेत, परंतु गत आठवड्यापासून लम्पीचा उद्रेक झाला आहे. सध्या १ हजार ९२ जनावरे बाधित असल्याचे स्पष्ट झाले. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ४८८ जनावरांचा समावेश आहे. बाधित जनावरांपैकी ७२ जनावरे दगावली आहेत. गाय २७, बैल १० आणि २५ वासरांचा मृत्यू झाला. जिल्ह्याच्या ज्या भागात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव जाणवत आहे. त्या ठिकाणी लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. बाधित जनावरांचे आयसोलेशन, औषधोपचार, लसीकरण याबाबत आवश्यक खबरदारी घेऊन पशुपालकांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.
लसीकरण व फवारणीसाठी पथके कार्यरत ठेवावीत. लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंद करणे, शर्यती बंद करण्यात येणार आहेत, याशिवाय जनावरांची वाहतूक बंद करण्याच्या उपाय योजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी दिल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात लम्पी रोगाचा पुन्हा प्रसार झाला असताना पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. ३ लाख २४ हजार ७५६ गाय वर्गीय जनावरांपैकी १ लाख ७५ हजार ५११ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले. उर्वरित लसीकरण गतीने राबविण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी सांगितले.