धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथील रहिवासी असलेल्या रोहन ज्ञानदेव लाटे या युवकाने बीसीएस शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. त्यानंतर युपीएससीची तयारी करण्यासाठी तो २०१८-२० मध्ये पंजाब येथे गेला. तर २०२० मध्ये झालेल्या युपीएससीच्या लेखी परीक्षेमध्ये तो पास झाला. दरम्यानच्या काळामध्ये कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे हा युवक देखील ढेकरी येथे येऊन राहिला. लॉकडाऊन असल्यामुळे कुठलीही भरती प्रक्रिया होत नसल्यामुळे आता आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा, असे विचार त्याच्या मनात सारखे घोळू लागले. उद्योगाची यादी त्याच्या नजरेत सारखी भिरभिरु लागली. मात्र पंजाबमध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत असताना त्याचे इतर दोन सहकारी याची आठवण आली. त्या दोन्ही सहकाऱ्याची घरी दुध डेअरी व्यवसाय सुरू असल्यामुळे त्याने त्यांना याबाबत विचारणा करून सविस्तर माहिती घेतली.
मित्रांच्या वडिलांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार, रोहन लाटे या तरुणाने प्रथम डेन्मार्क आणि युएसए या देशातील एचएफ जर्सी तसेच आयएसएफ या वाणाच्या पाच गायी आणल्या. या गायींपासून चांगले दूध मिळू लागल्याने त्याने आणखी २५ गायी आणल्या. आजघडीला त्याच्याकडे ३० गायी आणि १५ वासरे आहेत. या एका गायीपासून एका वेळी ३० लीटर हे दूध बारामती येथील सह्याद्री मिल्क या कंपनीस ३२ ते ३३ रुपये दराने विक्री केले जाते. या माध्यमातून घरच्या गायींच्या दूध विक्रीतून दररोज ८ हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. तर संकलन केलेल्या दुधापासून देखील दोन पैसे हाती येत आहेत. त्यामुळे या तरुणाने घेतलेला निर्णय सार्थ करून दाखविला असून इतर तरुणांनी देखील वेगवेगळे व्यवसाय सुरू करून आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
या तरुणाने जर हा मार्ग निवडला नसता तर त्याला अशा पद्धतीचा मार्ग सापडला नसता. त्यामुळे उच्च शिक्षणानंतर यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर सातत्य चिकाटी आणि त्यातील बारकावे याकडे अतिशय बारकाईने लक्ष देऊन उद्योग केला तर त्यामध्ये नक्कीच यश येते. या गायींसाठी १०० × १०० आकाराचे पत्र्याचे शेड उभा केलेला आहे. यामध्ये गायींना मुक्त सोडण्यात येत असून त्यांना लागणारा चारा स्वतःच्या शेतात तयार केला जात आहे. या व्यवसायासाठी रोहन यास त्याचे वडील आणि लहान भाऊ हे मदत करीत आहेत. ३० गायी आणि १५ वासरांची देखभाल करण्यासाठी फक्त १ मजूर लावला आहे. त्यामुळे खर्चात देखील मोठ्या प्रमाणात बचत झाली असून सुयोग्य नियोजन केल्यामुळेच या व्यवेसायामध्ये यश मिळाले आहे. रोहन लाटे या तरुणाने दूध व्यवसायाचे सर्व बारकावे तज्ञांकडून माहिती करून घेतलेले आहेत. तज्ञांच्या सल्ल्यानुसार या गोठ्यामध्ये असलेल्या गायींचे पडलेले शेण बाजूला उचलले जात नाही. कारण शेण आणि मूत्रामध्ये उष्णता असल्यामुळे इतर किटाणु मरून जातात. त्यामुळे या गायींना आजपर्यंत कुठलाही आजार झालेला नाही.