• Sat. Sep 21st, 2024

साहेब आधीच करोनाने मारलंय, आता तुम्ही तरी… जळगावात ईडीची धाड, अधिकाऱ्यांसमोर RL ज्वेलर्सच्या कामगारांचा टाहो

साहेब आधीच करोनाने मारलंय, आता तुम्ही तरी… जळगावात ईडीची धाड, अधिकाऱ्यांसमोर RL ज्वेलर्सच्या कामगारांचा टाहो

जळगाव: गेल्या काही दिवसांपासून राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहावर ईडीची कारवाई सुरु होती. या कारवाईनंतर राजमल लखीचंद ज्वेलर्स समूह बंद पडेल या भीतीने जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाच्या शोरुममधील तब्बल २०० पेक्षा जास्त कामगारांनी कारवाई करत असलेल्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कामगरांनी अधिकाऱ्यांपुढे टाहोच फोडला. ‘सर आधी कोरोनाने मारलं, आता तुम्ही मारू नका साहेब, कारवाई थांबवा सर्व मुद्देमाल जप्त करू नका आमचं काम बंद पडेल, आमची उपासमार होईल’, असं म्हणत कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांसमोर मोठा टाहो फोडला.

यावेळी तब्बल ४० ते ५० कामगार रडत होते. कारवाई थांबवा, सील करू नका, असं म्हणत अधिकाऱ्यांचे हात पाय पडत होते, अशी माहिती एका कामगाराने महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना दिली आहे.

८७ लाख रुपयांची रोकड, कोट्यवधींचे सोने सील

गेल्या दोन दिवसांपासून जळगावातील राजमल लकीचंद ज्वेलर्स समूह याठिकाणी तसेच त्यांचे ठाणे, नाशिक या ठिकाणच्या एकूण सहा फर्मवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. जळगावातील राजमल लकीचंद ज्वेलर्स समूहाच्या जळगावातील शोरुमवर गेल्या दोन दिवसांपासून ईडीचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक ठाण मांडून होते. दोन दिवसांपासून दिवसरात्र या ठिकाणी तब्बल चौकशी करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली.

समुद्राला उधाण, जाळी बोटीच्या पंख्याला अडकली, मच्छीमार बोटीबाहेर फेकले गेले, अन् मग
या दोन दिवसांच्या कारवाईत ईडीच्या पथकाकडून तब्बल ८७ लाख रुपयांची रोकड तसेच तब्बल कोट्यवधीचे सोने तसेच कागदपत्र जप्त करुन सील करण्यात आले आहे. यात तब्बल ५० किलो सोने असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिस बंदोबस्तात पथकाने सर्व सील केलेला मुद्देमाल एका लोखंडी पेटीत ठेवण्यात येवून पथक माघारी रवाना झाले आहे. जळगावातील स्थानिक स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत हा सर्व मुद्देमाल ठेवण्यात आला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

अश्रू अनावर झालेल्या कामगारांच्या भावना पाहून ईडीच्या वरिष्ठ महिला अधिकारीही झाल्या भावूक

ईडीचे कर्मचारी अधिकारी कारवाई करत असताना शुक्रवारी रात्री जळगावातील आर. एल. ज्वेलर्स शोरुमच्या सर्व २०० हून अधिक महिला तसेच पुरुष, अशा सर्व कामगारांनी ईडीचे वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी कामगार महिलांनी ईडीचे सहाय्यक संचालक असलेल्या महिला अधिकारी यांना मॅडम ‘आधी कोरोनाने मारलं, आता तुम्ही मारू नका, मॅडम भाड्याची खोली आहे, घर भाडे, तसेच इतर सर्व अडचणीमुळे जगणं अशक्य होईल’, असं म्हणत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

मुलीला बहिणीकडे सोडायला आला, समोर थरकाप उडवणारं दृश्य, भाऊजी गायब, बहीण अन् आई…
एका कामगाराने ‘मॅडम माझे आताच लग्न झाले आहे, लगेच दुसरी नोकरी मिळणार नाही, संसार उघड्यावर येईल’, असे हात जोडून सांगितले. एका वृध्द कामगाराने सांगितले, ‘मॅडम आम्ही याच ठिकाणी अनेक वर्षांपासून काम करत आहोत, आमचे मालक खूप चांगले आहेत, त्यांनी काहीच चुकीचे काम केले नाही, सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आम्हाला याठिकाणी कामाला ठेवलं. तेच आमचे मायबाप आहे, या कारवाईमुळे आमचं जगणं थांबून जाईल, त्यामुळे तुमच्या आम्ही सर्व पाया पडतो. यावेळी सर्व कामगारांनी हात जोडले. मात्र, कारवाई करू नका.

रडणारे तसेच अश्रू अनावर झालेल्या कामगारांच्या भावना ऐकून वरिष्ठ महिला अधिकारीही भाऊक झाल्या होत्या. आमचा सुद्धा नाईलाज आहे. घाबरू नका लवकरात लवकर कारवाई पूर्ण होइल, लवकरच तुमची काम पूर्ववत सुरु होईल असा विश्वास व्यक्त केला. अशी माहिती या भेटी दरम्यान प्रत्यक्ष उपस्थित कामगाराने बोलताना दिली आहे.

राजमल लखीचंद ज्वेलर्स उद्योग समूह बंद पडणार नाही, काही दिवसांन पुन्हा नव्या जोमाने सुरू करणार, ईश्वरलाल जैन याचे आश्वासन

गेल्या दोन दिवसांपासून राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहावर ईडीची कारवाई सुरू होती. आज पहाटे ही कारवाई संपली. या कारवाईनंतर ईश्वरलाल जैन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची कारवाई झाली म्हणून राजमल लखीचंद ज्वेलर्स समूह हा कायमचा बंद पडणार नाही. कामगारांनी धीर ठेवावा, १६८ वर्षांची तपश्चर्या अशी वाया जाणार नाही राजमल लखीचंद ज्वेलर्स उद्योग समूह मित्रांच्या हितचिंतकांच्या मदतीने पुन्हा काही दिवसांनी नव्या जोमाने सुरू करणार, असा विश्वास आर एल ज्वेलर्स समूहाचे मालक ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी व्यक्त केला आहे.

ईडीच्या सहा अधिकाऱ्यांच्या दोन पथकांकडून बड्या उद्योजकांच्या बंगल्यावर छापेमारी

आम्ही काही चुकीचे केलेले नाही, समन्स नुसार चौकशीसाठी जाणार

ईश्वरलाल जैन आणि त्यांच्या पत्नी तसेच मनीष जैन, त्यांच्या पत्नी अशा चार जणांना ईडीच्यावतीने समन्स बजावण्यात आले आहे. ईडीची ही कारवाई चुकीची आहे. मात्र, त्याबाबत कायदेशीर पद्धतीने लढा दिला जाईल, असे यावेळी ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी स्पष्ट केलं. आम्ही काही चुकीचे केलेले नाही त्यामुळे आम्ही समन्स बजावल्यानुसार चौकशीसाठी जाणार आहोत. राजकीय दबावतून ही कारवाई झाली असं मला वाटत नाही. कारण, तसा कुठलाही पुरावा नाही, त्यामुळे विना पुरावा असं बोलणं उचित होणार नाही, असे सुद्धा यावेळी ईश्वरलाल जैन यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed