मिळालेल्या माहितीनुसार, अमिना जहांगीर कोरबू (४०, रा. क्रांती नगर ता. मोहोळ, जि. सोलापूर) या विवाहित महिलेने पती सोबत झालेल्या किरकोळ भांडणातून स्वतःच आयुष्य संपवलं आहे. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अमिना कोरबू या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेतला आहे. अमिना कोरबूच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी जहांगीर कोरबू (४३,रा क्रांती नगर,ता.मोहोळ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करून घेतली आहे. जहांगीर कोरबू यांचा मोहोळ तालुक्यातील क्रांती नगर येथे इमिटेशन ज्वेलरीचा छोटासा व्यवसाय आहे. अमिना कोरबू आणि जहांगीर कोरबू हे दोघे जण या व्यवसायातूंन कुटुंबाची उपजीविका चालवत होते.
या दाम्पत्यास मुजमिल आणि मेहेरबानो अशी एक दोन मुलं आहेत. व्यवसायात तेजी मंदी असते. यावरून कधी कधी दोघांत खटके उडत होते. दोन दिवसांपासून अमिना आणि जहांगीर या दोघांत कुरबुर सुरू होती. १८ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अमिना आणि जहांगीर या दोघां पतीपत्नीत कडाक्याचे भांडण झाले होते. दोघेही रागाच्या भरात होते. पती जहांगीर हा पाणी पिण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला. अमिना कोरबू या विवाहितेने रागाच्या भरात दुसऱ्या खोलीत जाऊन दार लावून घेतले. पती जहांगीर हा पळत आला आणि खोलीचा दार उघड अमिना असे सांगू लागला. पतीने खिडकीतून डोकावून पाहिले असता पत्नी अमिना ही नायलॉनच्या दोरीने गळफास घेत असल्याचे दृश्य दिसले. पती जहांगीरने आरडाओरडा करत शेजाऱ्याना बोलावून घेतले आणि दार तोडून आत प्रवेश केला.
तोपर्यंत अमिनाने गळफास घेतला होता. आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने अमिनाला खाली उतरवून मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अमिना कोरबूच्या मृत्यूने मोहोळ तालुका हादरला. किरकोळ भांडणातून एवढे मोठे पाऊल कसे उचलले असे प्रश्न अनेकजण उपस्थित करू लागले. अमिनाच्या दोन्ही लहान मुलांना पाहून अनेकजण दुःख व्यक्त करत होते. मोहोळ पोलिसांनी सखोल चौकशी करत आजूबाजूच्या शेजाऱ्यांकडून माहिती घेतली. अमिनाने स्वतःहुन गळफास घेतला असल्याची आकस्मिक मयत म्हणून नोंद करून घेतली.